वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय गृह मंत्रालयाने आसाममधील चार जिह्यांमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (अफस्पा) आणखी सहा महिन्यांसाठी वाढवला आहे. तिनसुकिया, दिब्रुगड, चराईदेव आणि शिवसागर या चार जिल्ह्यांसाठी अफस्पा मुदत वाढविल्याची माहिती शुक्रवारी देण्यात आले. सदर अधिसूचनेची अंमलबजावणी 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. गृह मंत्रालयाने गुऊवारी अऊणाचल प्रदेशातील तीन, नागालँडमधील आठ आणि इतर काही भागात ‘अफस्पा’ची मुदत आणखी सहा महिन्यांसाठी वाढवली होती. या दोन ईशान्येकडील राज्यांमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर मंत्रालयाने हा निर्णय घेतला. त्यानंतर आसामच्या बाबतीतही तत्काळ निर्णय घेण्यात आला.
‘अफस्पा’ अंतर्गत अशांत भागात कार्यरत असलेल्या सशस्त्र दलाच्या जवानांना सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक वाटल्यास शोध, अटक आणि गोळीबार करण्याचे व्यापक अधिकार प्रदान केले जातात. अफस्पा अंतर्गत सशस्त्र दलांच्या ऑपरेशन्स सुलभ करण्यासाठी एखादे क्षेत्र किंवा जिल्हा अशांत क्षेत्र म्हणून घोषित केले जाते.









