30 जूनपर्यंत वाढविली मुदत : शुल्क घेण्याची प्रक्रिया सुरूच : आधारमधील चुका दुरुस्ती गरजेची
बेळगाव : आधारकार्डला पॅनकार्ड लिंक करण्यासाठी सध्या सर्वत्र धावपळ सुरू असतानाच सरकारने लिंक करण्यासाठीची मुदत वाढवून दिलासा दिला आहे. आता आधारकार्डला पॅनकार्ड लिंक करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढविलेली आहे. त्यामुळे नागरिकांनीही सुस्कारा सोडला आहे. सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शी व्हावेत, या हेतूने सरकारने अत्यंत सुज्ञपणे आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्याची घोषणा केली. प्रारंभी ही प्रक्रिया पूर्णत: विनामूल्य केली जात होती. त्यावेळी घाई कशाला निवांतपणे करू, असे म्हणत लोकांनीही ढिलाई दाखविली. लोकांनी अद्याप ही प्रक्रिया गांभीर्याने न घेतल्याने सरकारने परिपत्रक प्रसिद्धीस देऊन 31 मार्च 2022 पर्यंतची पहिली मुदत दिली. जेव्हा ही प्रक्रिया नि:शुल्क होती. त्यानंतर परत 30 जून 2022 पर्यंत ही मुदत सरकारने वाढवून दिली. तेव्हा 500 रुपयांची शुल्क आकारणी केली. इतके होऊनही सर्वांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने सरकारने आता 31 मार्च 2023 ही अंतिम मुदत असेल असे जाहीर करून 1000 रुपये शुल्क लागू केले. 26 मार्चच्या अंकात ‘तरुण भारत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नव्हती, ते खडबडून जागे झाले. त्यानंतर सर्वच माध्यमांमध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले. तथापि, 1000 रुपये शुल्क भरणे हे काहीसे सक्तीचे वाटल्याने याबद्दल चर्चा सुरू झाली. शिवाय 31 मार्चच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सायबर सेंटरकडे हेलपाटे घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे सेंटरमध्ये गेले दोन दिवस गर्दी दिसून आली. तथापि, आधारकार्ड लिंक करताना आधारकार्डमधील चुका दुरुस्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी काही दिवसांची मुदत गरजेची आहे. परिणामी सरकारच्या घोषणेबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.
आतापर्यंत 51 कोटी पॅनकार्ड आधारशी लिंक
31 मार्चपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होणे तसे अवघडही होते. मुळात सर्व्हरडाऊनचा फटका अनेकांना बसला. शिवाय लोकांची नाराजी लक्षात घेत आता आधारकार्ड व पॅनकार्ड लिंक करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढविण्यात आल्याचे सरकारने व सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (सीबीडीटी) जाहीर केले. आतापर्यंत 51 कोटी पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यात आलेली आहेत. मात्र अद्यापही अनेकांनी ही प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. दरम्यान सरकारने मुदत वाढवून दिली तरी 1 जुलैनंतरही ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचे पॅनकार्ड व्यवहार्य मानले जाणार नाहीत आणि पॅनकार्ड कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी उपयुक्त ठरणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
लिंक प्रक्रियेसाठीच्या शुल्काचा पुनर्विचार करा
सरकारने मुदत वाढवून देणे आवश्यक होते. लोक आधारकार्ड व पॅनकार्ड लिंक करण्याच्या तयारीत होते. पण इन्कमटॅक्सचे पोर्टल कार्यरत नसून ही सेवा उपलब्ध नाही, असेच संदेश येत होते. मुळात आधारकार्डमध्ये जन्म तारीख, नाव यामध्ये अनेक चुका आहेत. आधारकार्ड करण्यासाठी सरकारने अत्यंत घाई केली आणि त्यावेळी चुकीची माहिती भरली गेली. आता आधारकार्ड आणि पॅनकार्ड या दोन्हींमधील माहितीमध्ये साम्य असेल तरच ते लिंक होणार आहे. याचाच अर्थ प्रथम आधारकार्डमधील चुका दूर करून अपडेट करणे आवश्यक आहे. त्यानंतरच आधारकार्ड लिंक करणे सोपे जाईल. मुख्य म्हणजे यासाठी 1000 रुपयेसुद्धा डोईजड ठरणार आहेत. सर्वसामान्य माणसाला वाढती महागाई व शालेय प्रवेश फी या दोन्हींची पूर्तता करताना पॅनकार्डसाठी 1000 रुपयांचा भुर्दंड हा त्यांचे आर्थिक गणित चुकविणारा ठरणार आहे. शिवाय जर दिलेल्या मुदतीत कार्ड लिंक केले नाही तर दंड स्वरुपात किती पट्टीने रक्कम वाढणार आहे, याचा अंदाज नाही. मात्र ती भरमसाट असणार आहे. त्यामुळे सामान्य माणसाचे पेकाट मोडणार आहे, हे नक्की. म्हणूनच सरकारने पुन्हा एकदा या लिंक प्रक्रियेसाठीच्या शुल्काचा पुनर्विचार करावा.
– अॅड.दीपक अवर्सेकर, कर सल्लागार









