7 ऑक्टोबरर्पंयत बँकेत जमा करण्यासाठी किंवा बदलण्याची संधी : आरबीआयने जारी केले नवीन परिपत्रक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अजूनही 2000 रुपयांच्या नोटा घरी किंवा खिशात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा जमा आणि बदलण्यासाठी आधीच निश्चित केलेली मुदत वाढवली आहे. आता 7 ऑक्टोबरपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा कोणत्याही बँकेत जमा किंवा बदलून घेता येतील. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने 30 सप्टेंबर ही 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी अंतिम मुदत जाहीर केली होती.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांची नोट चलनातून काढून टाकण्यासाठी परिपत्रक जारी केले होते. 2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी किंवा बँकेत जमा करण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. 30 सप्टेंबरपर्यंत कोणतीही व्यक्ती कोणत्याही बँकेत 2000 रुपयांची नोट जमा किंवा बदलू शकत होती. पण, व्यापाऱ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला यापूर्वी ठरवून दिलेली मुदत वाढवण्याची विनंती केली. त्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने लोकांना एका आठवड्याची आणखी एक संधी दिली. 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी आधीच निश्चित केलेली मुदत 30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. सध्याच्या निर्धारित मुदतवाढीनुसार 8 ऑक्टोबरपासून 2000 रुपयांच्या नोटा दैनंदिन चलनातून कालबाह्या ठरणार आहेत.
1 सप्टेंबरपर्यंत 93 टक्के नोटा बँकिंग प्रणालीत जमा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, 1 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांच्या 93 टक्के नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या होत्या. या नोटांची एकूण किंमत 3.32 लाख कोटी रुपये आहे. गेल्या महिन्याभरात हा आकडा आणखी वाढला असला तरी काही नोटा अजूनही लोकांकडे असू शकतात अशी शक्यता गृहीत धरून मुदत वाढवण्यात आली आहे. लवकरच या नोटा बँकिंग प्रणालीतही परत येणार आहेत. विशेष म्हणजे विविध बँकांकडून घेतलेल्या आकडेवारीनुसार जमा झालेल्या 2000 रुपयांच्या 87 टक्के नोटा संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात जमा झाल्या आहेत. उर्वरित 13 टक्के रक्कम इतर नोटांसोबत बदलण्यात आली आहे.









