सांगली / प्रतिनिधी
मूळच्या म्हैसाळ योजनेतून वंचित राहिलेल्या किंवा अत्यल्प पाणी पुरवठा होणाऱ्या जत तालुक्यातील शेवटच्या टोकाच्या 65 गावांसाठी मंजूर झालेल्या विस्तारित म्हैसाळ योजनेच्या पाईपलाईन टाकण्याची सुरुवात झाली आहे. म्हैसाळ योजनेच्या तिसऱ्या टप्प्यापासून जतच्या शेवटच्या टोकापर्यंत ही पाईप जाणार आहे. मिरज तालुक्यातील आरग आणि लोणारवाडी येथून सध्या पाईप बसवण्याचे काम सुरू झाले आहे.
कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाच्या पाचव्या सुप्रमा अहवालामध्ये सिंचनापासून वंचित गावांना म्हैसाळ योजनेचा लाभ देण्याचा प्रकल्प मंजूर करण्यात होता. या अहवालास डिसेंबर 2022 मध्ये मान्यता मिळाली आहे. त्या अनुषंगाने म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच्या शीर्ष कामांची अंदाजपत्रके तयार करण्यात आली व निविदा प्रक्रिया पूर्ण करून अखेरीस या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.
यापूर्वीच राज्य सरकारने या कामासाठी 981 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद केली असून ती रक्कम खात्यावर जमा करून उर्वरित एक हजार कोटी रुपये सुध्दा तातडीने वर्ग करावेत अशी मागणी जत तालुक्यातील जनतेने केली आहे. 25 आक्टोबरला काम सुरू झाले नाही तर पुन्हा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने यापूर्वी प्रशासनाला देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आरग आणि लोणारवाडी येथे सुरू झालेल्या कामाला विशेष महत्त्व आहे.
या कामांमध्ये योजनेचे तीन पंपगृह बांधणे, ऊर्ध्वगामी नलिका व गुरुत्वीय नालिकेची कामे करणे प्रस्तावित आहेत. मूळ म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक तीनच्या संतुलन जलाशयांमधून पाणी उचलून एकूण 57 किलोमीटर अंतरावर मौजे येळदरी (ता. जत ) येथे भूतलांक 740 मीटर उंचीवर पाणी पोचविले जाणार आहे. यामध्ये ऊर्ध्वगामी नलिकांसाठी एम एस पाईप व जोड प्रवाही नालिकांसाठी पीसीसीपी पाईप वापरण्यात येणार आहेत. सदरच्या पाईप या मिरज, कवठेमंकाळ तालुक्यातून शेवटी जत तालुक्यापर्यंत जाणार आहेत. या नलिका कामाची मौजे आरग व लोणारवाडी येथे सुरुवात करण्यात आलेली आहे तसेच पाईपचा कार्यक्षेत्रावर पुरवठा सुरु आहे.