सांगली :
जिल्हा मध्यवर्ती बँकेने मार्च अखेरीचा वसुलीचा धडका लावला आहे. सर्वसामान्य थकबाकीदारांसह बडयांकडील कर्जाची वसुली सुरू केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून कोट्यवधीची थकबाकी असलेल्या माजी लोकप्रतिनिधीने आपल्या संस्थांकडील असलेली चकबाकी भरून खाते नील केले. मात्र विद्यमान लोकप्रतिनिधीच्या संस्थांकडील खाते अद्यापही पेंडीगच असून यांची थकबाकी कधी नील होणार याची चर्चा सध्या बँकेत सुरू आहे.
मार्च अखेरीच्या वसुलीसाठी जिल्हा बँकेने अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. कोणत्याही परिस्थितीत बँकेची एनपीए पाच टक्याच्या आत आणण्याचा आणि बँकेला राज्यात टॉपर न्यायचा प्रयत्न बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, सर्व संचालक मंडळ आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सुरू केला आहे. मार्च अखेर महिनाभर राहिल्याने सध्या मुख्यालयातील आणि तालुकास्तरावरील अधिकारी वसुलीसाठी गावागावात तळ ठोकून आहेत. सर्वसामान्यांसह बडयांकडील वसुलीवर भर दिला जात आहे. यासाठी सोसायट्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. जप्ती, लिलावासारखी कडक कारवाईडी केली जात आहे.
बँकेच्या कर्जदारांकडील वसुलीबाबत मार्च अखेरीला ज्या ज्या वेळी विषय येतो त्यावेळी कोट्यवधी रूपयांमुळे यापूर्वी अडचणीत आलेल्या टॉप थर्टी आणि बड्या राजकीय नेत्यांच्या संस्थांकडील अडकलेल्या संस्थांच्या थकबाकीवर चर्चा होते.
वर्षानुवर्षे ही थकबाकी वसुल का होत नाही. बँक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बोकांडावर बसते आणि बडयांकडे दुर्लक्ष करते असा आरोप होत होता. मात्र विद्यमान संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ यांनी घेतलेल्या कडक भूमिकेमुळे बड्या थकबाकीदारांची पाचावर धारण बसली आहे. यामुळेच जुने थकबाकीदार बँकेची थकबाकी भरण्यास तयार होत आहेत.
माजी लोकप्रतिनिधीच्या दोन-तीन संस्थांकडे कोट्यवधीची थकबाकी होती. ती संपूर्ण थकबाकी त्यांनी भरून बँकेचे कर्जाचे खाते नील केले. विद्यमान लोकप्रतिनिधींच्या संस्थांकडेही कोट्यवधीची थकबाकी आहे.
मार्च अखेरीला थकबाकी भरण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र किरकोळ रक्कमच भरली जाते, ती व्याजापोटीच जाते. यामुळे त्यांचे कर्ज खाते नील होत नाही. आता विद्यमान लोकप्रतिनिधींचे खाते कधी नील होणार अशी चर्चा बँकेत सुरू झाली आहे.
- या पाच सुतगिरण्यांच्या लिलावासाठी पुन्हा प्रक्रिया
जिल्हा बँकेची बड्या संस्थांपैकी पाच सुतगिरण्यांची लिलाव प्रक्रिया सुरू आहे. दोन कारखाने एनसीआरटीमध्ये गेले आहेत. त्यांच्याकडील वसुलीसाठीही प्रयत्न सुरू आहेत. पाच सुतगिरण्यांमध्ये स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणी तासगाव, खानापूर तालुका को ऑप स्पिनिंग मिल्स विटा, शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी इस्लामपूर, प्रतिबिंब मागासवर्गीय को ऑप इंडस्ट्रिज इस्लामपूर व विजयालक्ष्मी कॉटन मिल्स आटपाडी या सूतगिरण्यांच्या समावेश आहे. या सर्व सूतगिरण्यांकडे मिळून डिसेंबर २०२४ अखेर केवळ मुद्दलाची १३४ कोटी ४२ लाख ५२ हजार रुपये थकबाकी आहे. या संस्थांकडील वसुलीसाठी बँकेने पुन्हा फेर लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे.








