वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक कव्हर करण्यासाठी आलेली पाकिस्तानी अँकर झैनब अब्बासला भारत सोडून जावे लागले आहे. झैनाबने सोशल मीडियावर पूर्वी भारत आणि हिंदू धर्मावर वादग्रस्त ट्विट केले होते, यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने झैनाबला प्रेझेंटर आणि अँकरच्या यादीतून काढून टाकले आहे. इतक नाही तर तिची भारतातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सध्या ती दुबईमध्ये आहे. तिच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप तिने फेटाळले आहेत. यावर आयसीसीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
भारतातून हकालपट्टी झाल्यानंतर झैनाब सध्या दुबईत आहे. हिंदू धर्म आणि भारताविरोधात तिने यापूर्वी अपमानास्पद ट्विट केले होते. वर्ल्डकपसाठी ती भारतात आल्यानंतर हे ट्विट पुन्हा एकदा व्हायरल झाले होते. यानंतर सोशल मीडियावर हिंदू आणि भारताबद्दल अपमानास्पद टिपणी केल्याबद्दल झैनाबविरुद्ध सायबर तक्रार दाखल करण्यात आली होती. परिणामी तिला आता भारतातून बाहेर काढण्यात आले आहे आणि ती वर्ल्डकप कव्हर करू शकणार नाही. दरम्यान, झैनाब अब्बास ही पाकिस्तानी टेलिव्हिजन होस्ट आणि स्पोर्ट्स प्रेझेंटर आहे. 35 वर्षीय झैनाबने विविध चॅनेलसाठी काम केले आहे. 2021 साली इंग्लंडमधील स्काय स्पोर्ट्ससाठी ती काम करत होती. तसेच झैनाबने स्टार स्पोर्ट्ससाठी काम केले आहे. नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये तिने प्रेझेंटर म्हणून काम केले होते.









