डॉ. गोविंद काळे यांचे प्रतिपादन ः वरेरकर नाटय़ संघातर्फे रंगभूमी दिन
बेळगाव / प्रतिनिधी
भरतमुनींनी सव्वा दोन हजार वर्षांपूर्वी 36 अध्याय आणि 5 हजार 700 श्लोकांमधून नाटक कसे असावे हे नमूद केले आहे. नाटक हे एक शास्त्र आहे आणि तो वेदही आहे. भरतमुनींनी नाटकातील लहान लहान बारकावेही आपल्या ग्रंथांतून मांडले आहेत. आपल्यातला जो भाव आहे तो दुसऱयांसमोर प्रकट करणे म्हणजे नाटक, असे भरतमुनी आपल्या श्लोकांमधून सांगतात. त्यांच्यामुळेच भारतातील नाटक संस्कृती समृद्ध झाल्याचे प्रतिपादन डॉ. गोविंद काळे यांनी केले.
वरेरकर नाटय़ संघाच्यावतीने शनिवारी मराठी रंगभूमी दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. गोविंद काळे यांनी ‘भरतमुनींचे नाटय़शास्त्र’ या विषयावर मार्गदर्शन केले. कै. रुस्तुम रतनजी यांच्या स्मृतीस हा कार्यक्रम अर्पण करण्यात आला. व्यासपीठावर लेखिका आशा रतनजी, वृषाली मराठे, जगदीश कुंटे उपस्थित होते. रंगभूमी दिनानिमित्त बेळगावच्या ज्ये÷ रंगकर्मी डॉ. संध्या देशपांडे यांचा डॉ. गोविंद काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. गोविंद काळे म्हणाले, रंगमंच बांधताना त्या जागेची प्रथमतः पाहणी करावी, प्रकाश योजना कशी असावी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. नाटक म्हणजे देवाची आराधना आहे. जगातील प्रत्येक हालचाल, संवाद हे नाटकच आहे. चंद्र, सूर्य, तारे हे नाटकाचे नेपथ्य आहे. देवासमोर नाटक झाले पाहिजे. नाटकामुळे देवही आनंदित होतो, असे विचार भरतमुनींनी मांडले आहेत.
नाटक हे जीवनाला समाधान देणारे असते. कानाला आणि मनाला आनंद आणि डोळय़ांना तृप्ती देणारे असे नाटक असते. केवळ रंगमंचावर उभे राहून अभिनय करणे म्हणजे नाटक होत नाही तर संवादाप्रमाणे हालचाली, आवाजातील चढ-उतार, नजर आणि त्या प्रसंगाशी एकरुपता या सर्वांचे मिळून नाटक होते. आजवर विविध कलाकारांनी नाटय़ संस्कृती जोपासत ती इथवर आणली आहे. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी काय कार्य केले आहे यावर निदान एक नजर तरी टाकावी, असे आवाहन डॉ. गोविंद काळे यांनी उपस्थितांना केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नटराजाचे पूजन करण्यात आले. जगदीश कुंटे यांनी प्रास्ताविक केले. वृषाली मराठे यांनी परिचय करून दिला. यावेळी नाटय़ क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.









