भवानीनगर येथे काढण्यात आली निषेध फेरी : घोषणांनी परिसर दणाणला : व्हॅक्सिन डेपो परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप
प्रतिनिधी /बेळगाव
पोलिसांनी परवानगी नाकारत महामेळाव्यास आडकाठी घातली. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. यामुळे संतप्त झालेल्या म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी येथून जवळच असणाऱ्या भवानीनगर, मंडोळी रोड येथे निषेध मोर्चा काढून पोलिसांचा निषेध केला. यामध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
व्हॅक्सिन डेपो परिसरात नियोजित महामेळावा होणार होता. परंतु पोलिसांनी दडपशाही करत सोमवारी सकाळीच घालण्यात आलेला मंडप हटविला. व्हॅक्सिन डेपो येथे येणाऱ्या कार्यकर्त्यांना हुसकावले जात होते. येथे थांबाल तर गुन्हे दाखल करू, अशा धमक्या दिल्या जात होत्या. त्या परिसरात 144 कलम लागू करून कार्यकर्त्यांना तेथून हुसकावण्यात आले. तसेच व्हॅक्सिन डेपो परिसरात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पोलीस ताब्यात घेत होते. यामुळे पोलिसांचा निषेध करण्यासाठी तालुका व शहर समितीचे कार्यकर्ते भवानीनगर परिसरात जमले. याठिकाणी ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या घोषणांनी परिसर दणाणला होता. भवानीनगर परिसरात निषेध मोर्चा काढत कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकार व पोलिसांचा निषेध केला. हंगरगा, मंडोळी, कुद्रेमनी, सावगाव येथील कार्यकर्ते उपस्थित होते.
काहीवेळातच पोलीस घटनास्थळी
व्हॅक्सिन डेपो परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. कार्यकर्ते महामेळाव्याच्या ठिकाणी पोहोचू नयेत याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी भवानीनगर येथे जावून निषेध व्यक्त केला. हे समजताच काही वेळातच भवानीनगर येथे पोलिसांची वाहने दाखल झाली. पोलिसांच्या दडपशाहीतही म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.









