जुलैमध्ये 12.36 कोटी डॉलरची निर्यात :अमेरिका, चीनमध्ये घट
वृत्तसंस्था / कोलकाता
भारतातून गेल्या जुलै महिन्यात वस्तूंची निर्यात सर्वाधिक रशियाला झाली आहे. अमेरिका आणि चीन या देशांच्या निर्यातीमध्ये मात्र जुलैमध्ये घसरण दिसून आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भारतातील अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात जुलैमध्ये दुपटीने वाढून 12.36 कोटी डॉलरची रशियाला झाली असल्याचे समजते. वर्षाच्या आधी याच महिन्यामध्ये रशियाला 5.56 कोटी डॉलर्सची निर्यात करण्यात आली होती. अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषदेने या संदर्भात माहिती दिली आहे.
गेल्या जुलै महिन्यामध्ये अमेरिकेला 10.4 टक्के घसरणीसह 1.44 अब्ज डॉलरची निर्यात भारताने केली आहे. त्याचप्रमाणे भारताने चीनला जुलैमध्ये अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात 19.79 कोटी डॉलरची केली आहे. ही निर्यात 10 टक्के कमीच असल्याचे समजते. जगभरातील प्रमुख 25 देशांमध्ये भारतातील अभियांत्रिकी उत्पादनांची एकूण निर्यात 76टक्के इतकी असते. यापैकी 14 देशांमध्ये वर्षाच्या आधारावर पाहता जुलैमध्ये निर्यातीत घट दिसून आली आहे.
मागच्या महिन्यातील आकडेवारी
मागच्या महिन्यामध्ये अभियांत्रिकी वस्तूंची एकूण निर्यात 6.62 टक्के इतकी घटून 8.75 अब्ज डॉलर्सची राहिली आहे. एक वर्षाच्या आधी पाहता 9.37 अब्ज डॉलर्सची निर्यात भारताने एकंदर केली होती. लोखंड, पोलाद आणि अॅल्युमिनियम यांची जागतिक पातळीवर मागणी घटली असल्यामुळे निर्यातीवरही याचा परिणाम दिसून आला आहे. पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिका, उत्तर-पूर्व आशिया आणि सीआयएस देशांना निर्यातीमध्ये सकारात्मक वृद्धी झाली आहे.









