पोस्टातील निर्यात सेवेची दिली सविस्तर माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव पोस्ट विभागाच्यावतीने एक्स्पोर्टर मिट (निर्यातदार बैठक) उद्यमबाग येथे आयोजित करण्यात आली होती. खासदार मंगला अंगडी, बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष चन्नबसाप्पा होंडदकट्टी, पोस्ट विभागाचे अधीक्षक विजय वडोनी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. उद्यमबाग येथील निर्यातदार उद्योजकांना या बैठकीत पोस्ट विभागाच्या सेवांची माहिती देण्यात आली.
काही महिन्यांपूर्वी बेळगाव पोस्ट विभागाने बाहेरच्या देशांतील निर्यातीसाठी विशेष सेवा सुरू केली आहे. पोस्टल पार्सलसोबतच औद्योगिक व मोठ्या स्वरुपातील पार्सल सेवा पोस्टाने सुरू केली आहे. याची माहिती उद्योजकांना व्हावी, यासाठी उद्यमबाग येथील चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी पोस्टाच्या विविध योजना, पार्सल पॅकेजिंग, त्याची सुरक्षितता याविषयी माहिती देण्यात आली. पार्सल विभागाचे प्रमुख मंजुनाथ अंगडी यांनी उद्योजकांना निर्यातीसंदर्भात माहिती दिली.
पोस्ट अधीक्षक विजय वडोनी यांनी पोस्टाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती दिली. बेळगाव मुख्य पोस्ट कार्यालयात आधार नोंदणी, पासपोर्ट सेवा, बचत खाते, पोस्टल जीवन विमा यासह इतर सेवा दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार मंगला अंगडी यांनी पोस्ट विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. यावेळी शिल्पा कौजलगी, एम. बी. शिरूर यांच्यासह इतर उपस्थित होते.









