1200 जिलेटिन कांड्या, 300 इलेक्ट्रॉनिक डिटोनेटरचा समावेश : गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई :
दोन संशयितांना अटक
प्रतिनिधी / पणजी
धारबांदोडा–सावर्डे जंक्शन येथे बुधवारी रात्री गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलिसांनी केलेल्या कारवाईत जिलेटिन स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली असून त्यांच्या विरोधात भादंसं कलम 286 तसेच स्फोटक पदार्थ कायदा कलम 5 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती सीआयडी निरीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.
अटक केलेल्या संशयितांमध्ये भुजंग खटवकर (32) व तालक (35) यांचा समावेश आहे. दोघेही गुड्डेमळ, सावर्डे येथील आहेत. बेकायदा स्फोटके नेत असताना त्यांना रंगेहाथ अटक केली असून त्यांच्या जीए-09-डी-4278 क्रमांकाच्या कारमधून 150 किलोच्या 1200 जिलेटिन कांड्या व 300 इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर असलेले 6 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.
संशयितांची चौकशी केली असता स्फोटके खडी क्रशर क्वॉरीवर वापरण्यासाठी आणल्याची माहिती समोर आली. संशयितांना आज रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार असून सीआयडी पोलीस पुढील तपास करीत आहेत. सीआयडी निरीक्षक किशोर रामनन, साहाय्यक उपनिरीक्षक विजयकुमार साळगावकर, संतोष गोवेकर, कॉन्स्टेबल विशाल नाईक, राहुल नाईक व कल्पेश तोरसकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
राज्यात बेकायदेशीरपणे स्फोटके मोठ्या प्रमाणात येत असल्याने संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशा प्रकारे बेकायदा स्फोटके गोव्यात येत राहिली तर राज्यात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जप्त केलेली स्फोटके काळेथर दगड फोडण्यासाठी आणल्याचे संशयितांनी सांगितले असले तरी त्याचा दुऊपयोग होऊ शकतो, असा संशय व्यक्त होत आहे. अशा प्रकारे बेकायदा स्फोटके गोव्यात आणली जातात, यामागे बड्या धेंडांचा हात असून या प्रकरणाचा कसून तपास होणे आवश्यक आहे.
कडक बंदोबस्त असताना राज्यात स्फोटके येतातच कशी?
अशा प्रकारची स्फोटके खडी क्रशरवर लागणारे काळेथर दगड फोडण्यासाठी वापरली जातात. गोव्यात मोठ्या प्रमाणात क्रशर व खाणी आहेत. खाण व्यवसाय बंद असला तरी क्रशर सुरू आहेत. त्यामुळे प्रत्येक क्रशरवर अशी स्फोटके असण्याची शक्यता आहे. ती स्फोटके कायदेशीर आहेत की नाही, याचाही तपास करणे आवश्यक आहे. राज्याच्या हद्दीवर कडक बंदोबस्त असताना अशी बेकायदा स्फोटके गोव्यात येतातच कशी? ही बेकायदा स्फोटके गोव्यात कोण व कुठून आणली जातात? याचा सखोल तपास करून या प्रकरणात गुंतलेल्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.









