एफएटीएफ अहवालातून आले समोर : गोरखनाथ मंदिरावरील हल्लेखोराला पेपलद्वारे पेमेंट
वृत्तसंस्था/ पॅरिस
2019 च्या पुलवामा येथील आत्मघाती स्फोटाकरता स्फोटकसामग्री ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉनवरून खरेदी करण्यात आली होती. जगभरात दहशतवाद्यांना होणाऱ्या वित्तपुरवठ्यावर नजर ठेवणारी संस्था फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) स्वत:च्या अहवालात हा दावा केला आहे. एफएटीएफने स्वत:च्या अहवालात 2022 सालच्या उत्तरप्रदेशच्या गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिरावर झालेल्या हल्ल्याचाही उल्लेख केला आहे.
पुलवामा अन् गोरखपूर येथील घटनांना उदाहरणाच्या स्वरुपात सादर करत एफएटीएफने ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट सेवा चुकीच्या हातात गेल्यास त्या दहशतवादाला बळ पुरविण्याचे माध्यम ठरू शकतात असा इशारा दिला आहे.
ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सचा कशाप्रकारे दहशतवादासाठी वापर केला जात आहे हे या अहवालात सांगण्यात आले आहे. दहशतवादी संघटना आता पारंपरिक वित्तपुरवठ्याच्या पद्धतींसोबत डिजिटल माध्यमे म्हणजेच ऑनलाइन पेमेंट, गेमिंग प्लॅटफॉर्म्स, सोशल मीडिया आणि ई-कॉमर्स साइट्सचाही वापर करत असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
या प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, कारण ही प्लॅटफॉर्म्स आता दहशतवादी संघटनांसाठी एक नवे आणि प्रभावशाली माध्यम ठरत आहेत, असा इशारा एफएटीएफने जगभरातील सरकारे आणि डिजिटल कंपन्यांना दिला आहे.
दहशतवादाला होणार वित्तपुरवठा रोखावा
एफएटीएफच्या या अहवालाचे नाव ‘कॉम्प्रिहेंसिव्ह अपडेट ऑन टेररिस्ट फायनान्सिंग रिस्क’ आहे. 131 पानी हा अहवाल दहशतवादाला होणाऱ्या वित्तपुरवठ्याच्या पद्धती कशाप्रकारे बदलत आहेत हे सांगणारा आहे. अनेक देशांमध्ये दहशतवादाचा वित्तपुरवठा समजून घेणे अन् रोखण्याच्या क्षमतेत मोठ्या त्रुटी आहेत. या त्रुटी वेळीच दूर न करण्यात आल्यास दहशतवादी संघटना याचा लाभ उचलत राहतील. दहशतवादी संघटना कशाप्रकारे आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालीचा वापर करत स्वत:च्या कारवाया जारी ठेवणे आणि हल्ल्यासाठी करतात हे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. दहशतवादाशी संबंधित वित्तपुरवठ्याच्या रणनीति एकाच प्रकारच्या नसतात, तर वेगवेगळ्या ठिकाणी, वेगळ्या परिस्थितीनुसार वेगळ्या पद्धती अवलंबिल्या जातात असे या अहवालातून समोर आले आहे.
2019 साली पुलवामा येथे हल्ला
14 फेब्रुवारी 2019 रोजी सीआरपीएफचा वाहनताफा श्रीनगर-जम्मू महामार्गावरुन जात असताना पुलवामानजीक एका आत्मघाती दहशतवाद्याने कार धडकविली होती. या कारमध्ये 200 किलो इतकी विस्फोटके होती. स्फोट तीव्र असल्याने सुरक्षादलाच्या दोन बसेसचे मोठे नुकसान झाले. या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. हा हल्ला पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घडवून आणला होता असे तपासात स्पष्ट झाले होते. हल्ल्यात वापरण्यात आलेली स्फोटके भारतात सीमेपलिकडून आणली गेली होती. तर हल्ल्यात वापरण्यात आलेल्या बॉम्बमध्ये अॅल्युमिनियम पावडर टाकण्यात आली होती, जी स्फोटाला आणखी घातक करण्यासाठी वापरण्यात आली. ही अॅल्युमिनियम पावडर अमेझॉनवरून ऑनलाइन खरेदी करण्यात आली होती.
2022 मध्ये गोरखपूरमध्ये हल्ला
एफएटीएफच्या अहवालात दुसरे उदाहरण गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिरावर 4 एप्रिल 2022 रोजी झालेल्या हल्ल्याचे आहे. यात एका दहशतवाद्याने सुरक्षारक्षकांवर धारदार अस्त्राने हल्ला केला होता. यात जवान गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्याचा गुन्हेगार मुर्तजा अब्बासीकडून धार्मिक पुस्तक, धारदार अस्त्र, मोबाइल आणि लॅपटॉप मिळाला होता. मुर्तजाला विदेशातून पेपलद्वारे सुमारे 6.7 लाख रुपये जमा करत ते इस्लामिक स्टेटसाठी वळविले हेते, त्यानेच व्हीपीएनचा वापर करत स्वत:चा आयपी अॅड्रेस लपविला आणि स्वत:चा व्यवहार गुप्त ठेवला होता. या संशयास्पद आर्थिक व्यवहारानंतर पेपलने त्याचे अकौंट बंद केले होते, असे एफएटीएफच्या तपासात आढळून आले.









