पोलीस कंट्रोल रूमला फोन घणघणला अन् यंत्रणा हलली : महामार्गावर वांद्रीत टॅँकर अडवला, पण हाती लागले काही नाही
संगमेश्वर : स्फोटके भरलेला एक टॅंकर मुंबई ते गोवा महामार्गावऊन प्रवास करत असल्याचा फोन रविवारी पोलीस कंट्रोल ऊमला आला अन् खळबळ उडाली. त्यानंतर रत्नागिरी जिह्यातील प्रमुख ठिकाणी नाकाबंदी कऊन हा टॅंकर थांबवण्यात आला. मात्र यात कोणत्याही प्रकारची स्फोटके आढळून आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रत्नागिरी कंट्रोल रूम येथे एका व्यक्तीने फोन करून माहिती दिली की, स्फोटके असलेला एक टॅंकर मुंबई ते गोवा असा जात आहे. यानंतर पोलीस यंत्रणेमध्ये खळबळ उडाली. या माहितीच्या आधारे त्याप्रमाणे तातडीने रत्नागिरी जिह्यातील सर्व ठिकाणी पोलीस यंत्रणेकडून नाकाबंदी करण्यात आली होती. संगमेश्वर येथे नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदीदरम्यान तो टँकर महामार्गावरील वांद्री येथे थांबवण्यात आला व याची सर्व बाजूने पोलिसांमार्फत तपासणी करण्यात आली. यावेळी बॉम्ब शोध व नाशक पथकाद्वारेही कसून प्राथमिक तपासणी झाली. या तपासणीदरम्यान संशयित टँकरमध्ये कोणतीही बॉम्ब अथवा बॉम्बसदृश वस्तू अगर स्फोटक पदार्थ मिळून आलेले नाहीत, अशी माहिती पोलिसानी दिली.
पोलिसांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
आरडीएक्स स्फोटके भरलेला टँकर गोव्याच्या दिशेने येत असल्याच्या वृत्ताने गोवा पोलिसांची उडालेली धावपळ अखेर सदर टँकरमध्ये कोणतेही संशयास्पद साहित्य न सापडल्याने थांबली. सदर टँकर रत्नागिरी पोलिसांनी पकडला असता त्यात संशयास्पद असे कोणतेही साहित्य सापडले नाही. त्यामुळे विविध चेकनाक्यांवर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांसह गोवा पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. मुंबईतील एका व्यक्तीने फोन करून आरडीएक्स स्फोटके भरलेला टँकर गोव्यात येत असल्याचे महाराष्ट्र पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी गोवा पोलिसांना सतर्क केले होते. त्या वृत्तामुळे शनिवारी रात्रीपासूनच गोवा पोलिसांनी कडक पहारा ठेवत पत्रादेवीपासून पोळेपर्यंत सर्व चेकनाक्यांवर कडक बंदोबस्त ठेवला होता. सर्व सीमा सील करण्यात येऊन प्रत्येक वाहनाची कडक तपासणी करण्यात आली. रविवारी रत्नागिरी पोलिसांनी वांद्री येथे संशयास्पद टँकर ताब्यात घेतला. त्याची तपासणी केली असता त्यात पॉलिथीन बनविण्याचे सामान असल्याचे आढळून आले. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.









