सीआरपीएफ जवानासह महिला जखमी
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये हिंसक घटनांची मालिका सुरूच आहे. शनिवारी रात्री राज्याची राजधानी इंफाळमध्ये मणिपूरच्या मंत्र्याच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) जवान आणि एक महिला जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे आमदार युमनम खेमचंद यांच्या निवासस्थानाच्या गेटबाहेर स्फोटाची घटना घडली. खेमचंद हे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात पंचायती राज आणि ग्रामीण विकास मंत्रिपदाची धुरा सांभाळत आहेत.
इम्फाळ पश्चिम जिह्यातील युम्नाम लीकाई लारेम्बी मानिंग येथे मंत्र्यांच्या घराबाहेर बॉम्बस्फोट घडवण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. हा स्फोट ग्रेनेडच्या माध्यमातून घडवला असून मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी तो फेकल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्फोटात मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर कर्तव्यावर असलेल्या एका सीआरपीएफ जवानाच्या उजव्या हाताला दुखापत झाली. तसेच अन्य एक स्थानिक महिला रहिवासीही जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एन बिरेन सिंह घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत तपासाचे निर्देश दिले आहेत. पोलीस पथकाने परिसरात सुरक्षा वाढवत गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.
मणिपूरमध्ये मैतेई आणि आदिवासी कुकी यांच्यात 3 मे पासून जातीय संघर्ष सुरू झाला असून इंफाळमधील मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानांवर अनेक हल्ले झाले आहेत. पाच महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या हिंसाचारात किमान 178 लोक मारले गेले आणि 50,000 हून अधिक लोक विस्थापित झाले.









