घरगुती सिलिंडर 50 रुपयांनी महाग ः ‘व्यावसायिक’च्या दरात 350 रुपये वाढ
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच व्यावसायिक म्हणजेच कमर्शियल सिलिंडरच्या दरात तब्बल 350.50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. वाढलेले दर बुधवारपासूनच लागू झाले आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेला नजिकच्या काळात महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत.
नव्या दरवाढीनुसार आता मुंबईत घरगुती एलपीजीचे दर 1,052.50 रुपयांवरुन थेट 1,102.50 रुपये प्रति सिलिंडरवर पोहोचले आहेत. तसेच राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1,103 रुपयांवर पोहोचली आहे. कर्नाटकात आता घरगुती गॅससाठा 1,105.50 रुपयांहून अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. घरगुती सिलिंडरबरोबरच 19 किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत आता व्यावसायिक सिलिंडर 2,119.50 रुपयांना मिळणार आहे.
चालू वर्षात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात झालेली ही दुसरी वाढ आहे. 1 जानेवारी रोजी दरात 25 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. तसेच घरगुती सिलिंडरच्या दरात यापूर्वी 6 जुलै 2022 रोजी बदल करण्यात आला होता. त्यानंतर जवळपास आठ महिन्यांनी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली असली तरी घरगुती सिलिंडरच्या किमती मात्र काही महिने स्थिर होत्या. मात्र, आता मार्च महिन्याच्या प्रारंभीच घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलिंडर्सच्या दरात वाढ करण्यात आली आहे. एकंदर होळीपूर्वी देशातील सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे.
वर्षभरात घरगुती सिलिंडर 203.50 रुपयांनी महाग
गेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेल्या बदलाबाबत बोलायचे झाले तर त्यात एकूण 5 वेळा बदल झाला आहे. 22 मार्च 2022 रोजी सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढल्यानंतर दिल्लीत 899.50 रुपयांवरून 949.50 रुपयांवर पोहोचली होती. यानंतर, तेल विपणन कंपन्यांनी 7 मे 2022 रोजी किंमत 50 रुपयांनी वाढवल्यामुळे ती 999.50 रुपयांवर पोहोचली. त्याच महिन्यात 19 मे रोजी पुन्हा 3.50 रुपयांनी वाढ केल्यानंतर किंमत 1,003 रुपये झाली. 6 जुलै 2022 रोजीही सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर किंमत 1,053 रुपये झाली होती. आता पुन्हा एकदा 50 रुपयांनी वाढ केल्यामुळे सिलिंडरची किंमत 1,103 रुपये या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. एकंदर गेल्या वर्षभरात किंमत 203.50 रुपयांनी वाढली आहे.
जून 2020 पासून अनुदान बंद
जून 2020 पासून बहुतांश लोकांना एलपीजी सिलिंडरवर सबसिडी मिळत नाही. सध्या केवळ उज्ज्वला योजनेंतर्गत सिलिंडर मिळणाऱया लाभार्थींनाच 200 रुपये अनुदान मिळते. या अनुदानासाठी सरकार सुमारे 6,100 कोटी रुपये खर्च करते.
चार महानगरांतील सिलिंडर्सचे दर
शहर घरगुती सिलिंडर कमर्शियल सिलिंडर
दिल्ली 1,103.00 रुपये 2,119.50 रुपये
मुंबई 1,102.50 रुपये 2,071.50 रुपये
कोलकाता 1,129.00 रुपये 2,221.50 रुपये
चेन्नई 1,118.50 रुपये 2,268.00 रुपये









