एलॉन मस्क यांच्या मिशन मार्सला मोठा झटका
वृत्तसंस्था/ह्यूस्टन
टेक्सासच्या मॅसी येथे एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सच्या स्टारशिपच्या परीक्षणस्थळी मेठा विस्फोट झाला आहे. विस्फोटानंतर स्टारशिपच्या पुढील प्रक्षेपणाची तयारी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. स्टारशिपच्या महत्त्वपूर्ण स्टॅटिक फायर टेस्टची तयारी केली जात असताना ही दुर्घटना घडली. या परीक्षणात रॉकेटच्या इंजिन्सला जमिनीवर स्थिर ठेवत सुरू केले जाते. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. विस्फोटामुळे स्टारशिप प्रोटोटाइपला गंभीर नुकसान पोहोचले आहे. यामुळे स्पेसएक्सने प्रक्षेपण तयारी अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. कंपनी 29 जून रोजी सर्वात मोठ्या व शक्तिशाली रॉकेट सिस्टीमच्या 10 व्या परीक्षण उड्डाणची योजना आखत होती.
पूर्ण मोहिमेदरम्यान परीक्षण स्थळाच्या चहुबाजूला सुरक्षित क्षेत्र निर्माण केले होते व सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. स्टारबेस टीम स्थानिक अधिकाऱ्यांसोबत मिळून परीक्षणस्थळ व त्याच्या आसपासच्या क्षेत्राला सुरक्षित करण्यासाठी सक्रीय स्वरुपात काम करत आहे आणि लोकांसाठी कुठलाच धोका नसल्याचे स्पेसएक्सने म्हटले आहे. ही दुर्घटना स्टारशिप प्रोग्रामसाठी आणखी एक झटका आहे. चालू वर्षाच्या प्रारंभी दोन स्टारशिप परीक्षण उड्डाण प्रक्षेपणानंतर त्वरित झालेल्या विस्फोटांमुळे अयशस्वी ठरली होती. यातील एक कॅरेब्यान समुद्रात तर दुसरे अटलांटिक महासागरात कोसळले होते. स्टारशिपचा उद्देश माणसाला चंद्र आणि मंगळ ग्रहावर नेणे आहे.









