वृत्तसंस्था/ रोम
इटलीची राजधानी रोममधील पेट्रोलपंप आणि गॅस डेपोमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या अपघातात 21 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. स्फोटानंतर हवेत आगीचा मोठा गोळा दिसून आला. स्थानिक वेळेनुसार सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटानंतर घटनास्थळापासून 300 मीटर अंतरापर्यंत त्याची झळ पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. येथे एकामागून एक दोन स्फोट झाले आहेत. पहिल्या स्फोटापूर्वी गॅसचा वास येत होता. त्यानंतर दुसरा स्फोट झाला आणि आगीचा मोठा गोळा आकाशात पसरला.
स्फोटानंतर परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. याशिवाय सर्व कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढण्यात आले आहे. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी रोमच्या महापौरांशी चर्चा करून घटनेचा आढावा घेतला. घटनास्थळी अनेक अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.









