विश्वनिर्मितीची रहस्ये शोधण्याच्या छंदाने झपाटलेल्या अवकाश संशोधकांचे लक्ष आता आकाशगंगेच्या परिघाकडे गेले आहे. आपली पृथ्वी किंवा सूर्यमालेपासून अगदी दूरवर असणाऱया भागाकडे आजवर संशोधकांचे लक्ष वेधले गेले नव्हते. मात्र आता एरीज आणि रोम येथील संशोधकांनी या दूरवरच्या भागांमधील परिस्थितीचे संशोधक करण्यास प्रारंभ केला आहे. या संशोधनातून केवळ विश्वनिर्मितीचाच थांगपत्ता लागू शकेल असे नाही तर पृथ्वीवरील अनेक मौले कशी निर्माण झाली याचेही गूढ उकलण्याची शक्यता आहे, असे तज्ञांचे मत आहे.
सोने आणि प्लॅटिनम आदी पृथ्वीवर मूल्यवान समजल्या जाणाऱया धातूंची निर्मिती कशी झाली, तसेच गॅमा किरणांचा विस्फोट आदींची माहिती या संशोधनामधून मिळणार आहे. या संशोधनात भाग घेत असलेली एरीज ही संस्था भारतीय आहे. आर्यभट्ट प्रक्षेपण विज्ञान संशोधन संस्था असे या संस्थेचे पूर्ण नाव आहे. या संस्थेच्या संशोधकांचे एक दल या संशोधनात समाविष्ट झाले आहे. याचे नेतृत्व डॉ. शशीभूषण पांडेय हे करीत आहेत. नुकताच अवकाशात दिसून आलेला गॅमा किरण विस्फोट ही एक अद्भूत वैश्विक घटना आहे, असे ते मानतात. असे भयानक विस्फोट विश्वात नेहमीच होत राहतात. पण ती एक नित्य अवकाशीय घटना आहे, असे समजून आजवर तिच्याकडे लक्ष न देण्याची प्रथा होती. तथापि, आता या घटनेवर नव्याने प्रकाश पाडला जात असून शास्त्रज्ञांना या संशोधनाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. त्या किती प्रमाणात साध्य होतात ते काळच सांगणार आहे.









