बृजभूषण विरोधात 17 जण साक्षीदार : आरोपपत्रात दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कुस्तीपटू आणि बृजभूषण शरण सिंह यांच्यातील वादाला नवे वळण मिळाले आहे. बृजभूषण विरोधात पीडित कुस्तीपटूंनी पोलीस आणि न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबाबाच्या समर्थनार्थ 17 जणांनी साक्ष देत आरोप खरे असल्याचे म्हटले आहे. आरोपपत्रात 6 पीडित कुस्तीपटूंच्या कुटुंबीयांना साक्षीदार ठरविण्यात आले आहे. यात एका कुस्तीपटूच्या पतीचाही समावेश आहे. एका महिला कुस्तीपटूने बृजभूषण यांच्याकडून 6 ठिकाणी छेडछाड करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
तीन सहकारी कुस्तीपटूंनी पीडितांच्या दाव्यांची पुष्टी देत त्यांच्या बाजूने साक्ष दिली आहे. याचबरोबर कुस्तीपटूंकडून छायाचित्र सादर करण्यात आले असून ते आरोपपत्राचा हिस्सा आहे. हे छायाचित्र सिरीफोर्ट ऑडिटोरियममधील एका कार्यक्रमादरम्यानचे आहे.
लैंगिक शोषण, छेडछाड आणि पाठलाग करण्याच्या गुन्ह्dयांसाठी बृजभूषण यांच्यावर खटला चालविला जाऊ शकतो असे दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केले आहे. बृजभूषण यांच्याविरोधात कलम 354 (महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणे) आणि कलम 354 अ (लैंगिक शोषण), कलम 354 ड (पाठलाग करणे) अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.
याप्रकरणी बृजभूषण यांच्या वतीचे साक्षीदार तसेच दस्तऐवजांना पडताळणीसाठी पाचारण केले जाऊ शकते असे आरोपपत्रात म्हटले गेले आहे. दिल्ली पोलिसांनी तपासादरम्यान 108 साक्षीदारांची चौकशी केली आहे. या साक्षीदारांमध्ये भारतीय कुस्ती महासंघाचे पदाधिकारी, कुस्ती स्पर्धांच्या रेफ्रींसमवेत सह-स्पर्धक सामील आहेत. 108 पैकी 17 साक्षीदारांनी कुस्तीपटूंकडून करण्यात आलेल्या आरोपांची पुष्टी केली आहे.
याप्रकरणी तपासादरम्यान एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी रोहतक, सोनिपत, लखनौ इत्यादी ठिकाणांचा दौरा केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी कर्नाटकातील बेळ्ळारी येथे जातही तपास केला आहे. तसेच हरियाणात अनेक सह-कुस्तीपटूंची चौकशी करण्यात आली आहे. सर्व पीडितांचे जबाब कलम 161 आणि कलम 164 अंतर्गत नोंदविण्यात आले आहेत.









