जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती : बिम्समध्ये विकास आढावा बैठक
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची व वैद्यकीय साहित्याची लवकरच पूता करण्यात येईल. यासाठी आरोग्य खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. यावेळी आमदार राजू सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, बिम्सचे संचालक अशोककुमार शेट्टी आदी उपस्थित होते.
येथील बिम्सच्या कार्यालयात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या विकास आढावा बैठकीत ते बोलत होते. बिम्स शैक्षणिक आढावा रुग्णालयाच्या कामांची माहिती आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यामध्ये नर्सिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. यासाठी आरोग्य खात्याच्या मंत्र्यांबरोबर चर्चा करून विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरविल्या जातील. रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असून कर्मचारी नेमणुकीचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. रुग्णालयामध्ये उपचारासाठी गोवा व महाराष्ट्र येथून रुग्ण येत आहेत. यासाठी जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांची नेमणूक समुदाय आरोग्य केंद्र, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र तसेच तालुका रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना याची सोय होणार आहे, असे जिल्हा सर्जन डॉ. आर. व्ही. शिंदे यांनी सांगितले. प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेंतगृ तत्काळ उपचारासाठी एमआयसीयू, आयसीयू अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 50 खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. याचे काम हाती घेण्यात आल्याची माहितीही आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
बिम्स व जिल्हा रुग्णालयामध्ये 1040 खाट आहेत. यामध्ये शस्त्रचिकित्सा विभाग, प्रसूती विभागासह तीन विभाग असल्याने रुग्ण व विद्यार्थ्यांना समस्या निर्माण होत आहेत. यासाठी रुग्णांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी 450 खाटांचे अभ्यास रुग्णालय मंजूर करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव देण्यात आल्याचे बिम्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
विविध सुविधा उपलब्ध
प्रसूती विभागासाठी 100 खाटांच्या रुग्णालयाला मंजुरी मिळाली असून काम सुरू आहे. एमआरआय, सिटीस्कॅन, एक्सरे, मायक्रोबायोलॉजी प्रयोगालय, बायोकेमिस्ट्री पॅथॉलॉजी, अतिदक्षता विभाग यासह 24 तास सेवा उपलब्ध असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. वैद्यकीय विज्ञान संस्थेकडून सांडपाणी प्रकल्प उभारण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. यासाठी निविदा मागविण्यात आली असून लवकरच वर्कऑर्डर दिली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी विविध विभागांना भेट देऊन पाहणी केली. सुरू असलेली विकासकामे, कॅन्टीन व्यवस्था, नर्सिंग विद्यार्थ्यांचे कक्ष, रुग्णालय आवारातील उद्यान व सुविधांची पाहणी केली.