लखनपूरपासून पवित्र गुहेपर्यंत 70 आरोग्य केंद्रांची स्थापना
वृत्तसंस्था / जम्मू
दरवर्षी अमरनाथ यात्रेदरम्यान अनेक भाविकंची अधिक उंचीवरील प्रदेशशात प्रकृती बिघडत असते किंवा हृदयविकाराच्या धक्क्यामुळे मृत्यू होत असतो. मागील यात्रांमधून धडा घेत श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने यंदा आरोग्य तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 जूनपासून सुरू होत असलेल्या यात्रेत लखनपूरपासून भोले बाबाच्या भवनापर्यंत आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. यात जम्मू-काश्मीरसह देशाच्या अनेक भागांमधून सुमारे दीड हजार डॉक्टर तसेच अन्य आरोग्य कर्मचारी भाविकांच्या प्रकृतीची काळजी घेणार आहेत.
भाविकांच्या सुविधेसाठी 70 आरोग्य केंद्रे स्थापन केली जात असून यात 6 बेस हॉस्पिटल, 11 वैद्यकीय मदत केंद्रे, 12 आपत्कालीन मदत केंद्रांचा समावेश आहे. 26 ऑक्सिजन बूथ देखील स्थापन पेले जाणार आहेत. काही पथकांना अलर्टवर ठेवण्यात येईल, जेणेकरून आपत्कालीन स्थितीत त्यांचा सेवेचा वापर करता येईल. जम्मू-काश्मीरमधून एकूण 739 आरोग्य कर्मचाऱयांना नियुक्त केले जाणार आहे. यात तज्ञ डॉक्टर देखील सामील असतील. आरोग्य संचलनालयासह जम्मूमधील वैद्यकीय महाविद्यालयाकडून डॉक्टर तसेच अन्य कर्मचाऱयांची यादी तयार केली जात आहे.
8-10 तज्ञ डॉक्टरांना यात्रामार्गावर तैनात केले जाणार आहे. अमरनाथमधील पवित्र गुहा समुद्रसपाटीपासून 12729 फुटांच्या उंचीवर असल्याने तेथे ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. तसेच यात्रा मार्ग दुर्गम असल्याने अनेक भाविकांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होतो. 2009 मध्ये 45 भाविकांचा हृदयविकाराच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला होता. 2010 मध्ये हे प्रमाण 68 तर 2011 मध्ये 105 राहिले होते. 2012 मध्ये अमरनाथ यात्रेला जाणाऱया 130 भाविकांचा मृत्यू झाला होता. 2018 मध्ये 55 भाविकांचा मृत्यू झाला होता.









