मध्यवर्ती म. ए. समितीच्या पाठपुराव्याला यश : महत्त्वाच्या बाबींवर होणार चर्चा
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या दाव्याला कायदेशीर सल्ला देण्यासाठी बुधवार दि. 10 सप्टेंबर रोजी तज्ञ समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 3 वाजता मुंबई येथील मंत्रालयामध्ये ही बैठक होणार आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तज्ञ समितीची बैठक होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने बैठकीचे आयोजन केले आहे. तज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला खासदार धनंजय महाडिक तसेच इतर सदस्य उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीमुळे सीमाप्रश्नाच्या दाव्याला गती मिळण्याची शक्यता आहे. तज्ञ व उच्चाधिकार समितीची बैठक लवकर बोलवावी, अशी मागणी मध्यवर्ती म. ए. समितीने केली होती. महाराष्ट्र सरकारला वारंवार पत्र लिहून तसेच लोकप्रतिनिधींना भेटून बैठकीची मागणी लावून धरण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच तज्ञ समिती गठित करण्यात आली. त्यामध्ये खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, प्रतापसिंह जाधव, दिनेश ओऊळकर, अॅड. महेश बिर्जे, अॅड. रवी पाटील, मध्यवर्ती म. ए. समितीचा एक पदाधिकारी यांच्यासह इतर सदस्यांची निवड करण्यात आली होती. सदस्यांची निवड झाल्यानंतर आता बैठकीचे आयोजन करण्यात आल्याने सीमावासियांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









