आजपर्यंत आमची दोस्ती अनुभवली आता, धगधगत्या मशालीची आग अनुभवा असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख
उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे. तसेच शिवसेनेच्या नरडीला हात घातला आहे. पण भाजपचा राजकारणातून पूर्ण नित्पात केल्याशिवाय राहणार नसल्याचेही ते म्हणाले. जळगावातील जाहीर सभेला संबोधित करताना भाजपासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खरपूस टीका केली.
जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. उद्धव ठाकरे यांची भव्य सभा झाली. यावेळी जनसमुदायाला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पक्षातील प्रतिस्पर्धी एकनाथ खडसे यांना संपवण्याचं काम केलं. आणि आता आयारामांना पक्षाच्या निष्ठावंतांच्या उरावर बसवले आहे. ज्याप्रमाणे अयोध्येतील राम मंदिर बांधण्यात आले त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही देवेंद्र फ़डणवीस हे ‘आयाराम’ मंदिर बांधत आहेत. सुरवातीला भाजपाला कोणताही विचार नव्हता पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची दिशा दाखवली. नाहीतर भाजप कुठे तळागळात गेला असता, कळलं नसतं.” अशी जोरदार टिका त्यांनी केली.
पुढे बोलवताना ते म्हणाले, “‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ हा नारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी बुलंद केल्यानेच भाजपाला सत्ता मिळाली. बाळासाहेबांनी भाजपला ‘तुम्ही देश सांभाळा, आम्ही महाराष्ट्र सांभाळतो,’ असं सांगितलं होतं. पण, देश, महाराष्ट्र, मुंबई, बाजार समित्या, सोसायट्याही भाजपला पाहिजे.” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला.
शेवटी बोलताना ते म्हणाले, “शिवसेनेच्या नरडीला हात घातल्यामुळेच भाजपला राजकारणात पूर्ण नित्पात केल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंत तुम्ही आमची दोस्ती अनुभवली आता, आमच्या धगधगत्या मशालीची आग अनुभवा,” असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला.