सातारा :
सातारा शहरात घरफोडी करणाऱ्या एका सराईत आरोपीला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जीवन शहाजी रावते (रा. दत्तनगर, सातारा) असे असून त्याच्याकडून 18 तोळे सोने असा 18 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सराईत आरोपी जीवन शहाजी रावते याने जून महिन्यामध्ये सातारा शहरातील डिफेन्स कॉलनी, विकासनगर या परिसरात असलेल्या घरातील कपाटातून 18 तोळे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला होता. त्याप्रमाणे सातारा शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथक आरोपीच्या मागावर होते.
आरोपी जीवन रावते हा साताऱ्यातील एमआयडीसी परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत तत्काळ अटक केली. पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता त्याने घरातील कपाटातून दागिने चोरी केल्याचे कबूल केले. आरोपी जीवन शहाजी रावते यांच्यावर या अगोदर घरफोडीचे 13 गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय अधिकारी राजीव नवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक श्याम काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार सुजित मोरे, निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, पो. ना. पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले, सुहास कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, यांनी केली आहे.








