अनगोळ परिसरात जल्लोषी स्वागत, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, दौडला मंगळवारी तुफान प्रतिसाद
बेळगाव : टिळकवाडी-अनगोळ परिसरात मंगळवारी झालेल्या दौडवेळी मोठ्या जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात आले. ‘जय भवानी जय शिवाजी’च्या गजरात काढण्यात आलेल्या दौडला हजारो शिवभक्तांची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे, भव्य स्वागत कमानी, भगव्या पताका यामुळे शिवभक्तांना शिवशाहीची अनुभूती आली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित दुर्गामाता दौडला मंगळवारी नवव्या दिवशी तुफान प्रतिसाद मिळाला. शिवाजी कॉलनी, टिळकवाडी येथून दुर्गामाता दौडला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून आरती म्हणण्यात आली. सीपीआय परशुराम पुजारी यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. त्यानंतर महर्षी रोड, पहिले रेल्वेगेट, शुक्रवार पेठ, सोमवार पेठ, आरपीडी क्रॉस येथे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
अनगोळमध्ये जल्लोषात स्वागत
अनगोळ नाका येथून दुर्गामाता दौडचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भाग्यनगर, तसेच अनगोळ येथील गल्ल्यांमध्ये युवक तसेच महिला मंडळांनी जय्यत तयारी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील सजीव देखावे सादर करून शिवचरित्र उलगडून दाखविण्यात आले. संपूर्ण परिसर भगवे ध्वज व फुलांनी सजविण्यात आला होता. लक्ष्मी गल्ली येथील महालक्ष्मी मंदिरात दौडची सांगता झाली. डॉ. गोपाळराव साळुंखे यांच्या हस्ते दौडचा ध्वज उतरविण्यात आला.
अभिनेता राहुल सोलापूरकर राहणार उपस्थित
गुरुवार दि. 2 ऑक्टोबर रोजी यावर्षीच्या दुर्गामाता दौडची सांगता होणार आहे. या सांगता सोहळ्याला अभिनेता व व्याख्याते राहुल सोलापूरकर उपस्थित राहणार आहेत. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी वक्तृत्व स्पर्धा तसेच राज्यनाट्या स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळविली. त्यांनी आजवर 25 व्यावसायिक नाटके केली असून 100 हून अधिक चित्रपट केले आहेत. राजर्षा शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित मालिकेमध्ये त्यांनी राजर्षी शाहू महाराजांची भूमिका साकारली होती.
दुर्गादौडीचा उद्याचा मार्ग
गुरुवार दि. 2 ऑक्टोबर रोजी मारुती गल्ली येथील मारुती मंदिरापासून दुर्गामाता दौडला सुरुवात होणार आहे. नरगुंदकर भावे चौक, महालक्ष्मी मंदिर बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, बसवाण्णा मंदिर, अशोक चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, रिझ टॉकीज रोड, कोनवाळ गल्ली, अनसुरकर गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, केळकर बाग, समादेवी गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, नार्वेकर गल्ली, शनिवार खूट, काकतीवेस रोड, गणाचारी गल्ली, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, कंग्राळ गल्ली, काकतीवेस रोड, कंग्राळ गल्ली मागील बाजू, सरदार्स ग्राऊंड रोड, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोडमार्गे धर्मवीर संभाजी चौकात दुर्गामाता दौडची सांगता होणार आहे.









