एल अॅण्ड टी कंपनीच्या त्या दोघा कर्मचाऱ्यांनी सत्कारप्रसंगी व्यक्त केल्या भावना
प्रतिनिधी/ बेळगाव
उत्तराखंड येथील बोगद्यामध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढताना एक वेगळा थरार आम्हाला अनुभवता आला. आमच्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. आम्ही सर्वांना यशस्वीरीत्या कशा प्रकारे बाहेर काढू, या प्रयत्नात होतो. प्रत्येक मिनिटाला आतील परिस्थिती काय आहे हे आम्ही इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना देत होतो. हे सांगत असताना आम्हाला पुढे काय होणार, याची चिंता लागली होती. अंगारे शहारे येण्यासारखे प्रसंग आम्हाला वेळोवेळी आले. साहस, धाडस आणि थरार यांचा अनुभव घेत आम्ही यशस्वी झालो. याचा आम्हाला अभिमान आहे, असे एल अॅण्ड टी कंपनीच्या त्या दोघा कर्मचाऱ्यांनी सत्कारप्रसंगी सांगितले.

शनिवारी महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये हा सत्कार करण्यात आला. अभियंता दौदीप खाडा (रा. वेस्टबंगाल) आणि भालचंद्र किलारी (रा. वडगाव, बेळगाव) हे एल अॅण्ड टी कंपनीमध्ये कार्यरत आहेत. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथील सिल्क्यारा बोगद्यामध्ये अडकलेल्या कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी बेळगावमधील एल अॅण्ड टी कंपनीचे दोघा जणांनी प्रयत्न केले होते. महत्वाचे म्हणजे मायक्रो कॅमेरा पाठवून त्या कामगारांची बोगद्यामध्ये असलेले पहिले छायाचित्र त्या दोघांनी काढले होते. या दोघांनीही मोठे सहकार्य केल्यामुळे त्यांचा सत्कार आमदार राजू सेठ यांच्या हस्ते करण्यात आला.
मायक्रो कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांनी बोगद्यातील आतील संपूर्ण परिस्थिती संदर्भातील छायाचित्रे घेतली होती. पहिले छायाचित्र या दोघांनीच संपूर्ण देशाला दाखविले. त्यानंतर नियोजनबध्दरित्या इतर सहकाऱ्यांनी प्रयत्न करुन त्या 41 कामगारांना अथक परिश्रामाने 17 दिवसानंतर बाहेर काढले होते. यामध्ये या दोघांचाही सिंहाचा वाटा होता. त्यामुळे हा सत्कार करण्यात आल्याचे आमदार राजू सेठ यांनी सांगितले. यावेळी साऱ्यांनीच त्यांचे कौतुक केले.
एक वेगळा अनुभव व थरार पहायला मिळावा
उत्तराखंड येथील सिल्क्यारा बोगद्यामध्ये काम करताना कसा अनुभव आला, असे विचारले असता आम्हाला साऱ्यांचा जीव वाचविता आला, हेच मोठे काम होते. याचा आम्हाला आनंद झाला. प्रत्येक मिनीटाला आतील परिस्थिती काय आहे? हे आम्हाला समजत होते. आतमध्ये सापडलेल्या कामगारांनीही तेवढ्याच धैर्याने आम्हाला सहकार्य केले. हे काम करत असताना आम्हाला वेगळा अनुभव आला तसेच थरार देखील पहायला मिळाला, असे दौदीप खाडा व भालचंद्र किलारी यांनी सांगितले.
आमच्याकडे संपूर्ण देशाचेच लक्ष होते. आम्ही त्या कामगारांना सुखरुप कशा प्रकारे बाहेर काढू, याच चिंतेत होतो. मात्र देवाची साथ आणि साऱ्यांचेच अथक परिश्ा़dरम फळाला आले, असेही त्यांनी सांगितले. या सत्काराप्रसंगी एल अॅण्ड टी कंपनीचे जनरल मॅनेंजर हार्दिक देसाई, प्रोजेक्ट मॅनेंजर धिरज उभेंकर आदी उपस्थित होते.









