पुणे / वार्ताहर :
‘ब्लू डार्ट एक्सप्रेस’ या कुरिअर कंपनीच्या मालवाहतुकीदरम्यान गाडीतून महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली. आरोपींकडून आय फोन, आय पॅड असा 3 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पद्मावती भागातून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
अभिजीत अरुण जाधव (वय 26, रा. मुकादमवाडी, कुरकुंभ, दौंड), अक्षय संभाजी निंबाळकर (वय 23 वर्ष, मळद, ता. दौंड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सहकारनगर भागातून इलेक्ट्रॉनिक मुद्देमाल चोरी गेल्याचा प्रकार घडला होता. याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हय़ाचे गांभीर्य लक्षात घेऊन युनिट दोनकडून तपास करण्यात येत होता. या दरम्यान दोन संशयित इसम पद्मावती ट्रॅव्हल्स पार्किंग भागात चोरीचे महागडे फोन विक्रीसाठी आले असून, ते ग्राहक शोधत असल्याची माहिती अंमलदार पुष्पेंद्र चव्हाण, अमोल सरडे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता आरोपीकडे मुद्देमाल आढळून आला. त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली.









