तीन मोफत गॅस सिलिंडरचे आश्वासन पूर्ण करायला मात्र सरकारकडे निधी नाही
मडगाव : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्यालयाच्या सुमारे 10 कोटी खर्चाच्या अवास्तव नूतनीकरणाचा गोवा फॉरवर्ड पक्षाच्या उपाध्यक्षा अॅड. अश्मा सय्यद यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हा अतिरेकी खर्च म्हणजे गोव्यातील महिलांचा अपमान करण्यासारखे आहे. विशेषत: भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात महिलांना तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याचे दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी निधी नाही असे सरकार म्हणत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा अवाजवी खर्च अधिकच डोळ्यांत खुपतो, असे त्यांनी म्हटले आहे. गोव्यातील कित्येक कुटुंबे वाढता खर्च आणि आर्थिक अडचणींशी झगडत असताना समाजातील गरीब आणि उपेक्षित घटकांच्या गरजा पूर्ण करण्याऐवजी गोवा सरकार मुख्यमंत्री आणि भाजपच्या अहंकारी इच्छांना प्राधान्य देत आहे. हे पाहणे अत्यंत निराशाजनक आहे. मुख्यमंत्री कार्यालयावरील हा अनाठायी खर्च ही हास्यास्पद गोष्ट आहे. गोव्यातील महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या आकलनाचा मुख्यमंत्री सावंत यांच्यामध्ये तीव्र अभाव दिसून येतो, असे सय्यद याप्रसंगी म्हणाल्या. गोवा फॉरवर्डला ठामपणे वाटते की, लोकांच्या, विशेषत: कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांच्या तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारी निधीचे वाटप केले जावे. गोव्यातील महिलांना तीन मोफत गॅस सिलिंडर मिळाल्यास त्यांचा आर्थिक भार कमी झाला असता आणि त्यांचे कल्याण झाले असते. मात्र, मुख्यमंत्री त्यांच्याबाबत असंवेदनशील आहेत. त्यांच्या कृतीतून चुकीचा प्राधान्यक्रम आणि महत्त्वाच्या सामाजिक कल्याण उपक्रमांबद्दलच्या वचनबद्धतेचा अभाव दिसून येतो, असे त्या पुढे म्हणाल्या. गोवा सरकारने ताबडतोब त्यांच्या प्राधान्यक्रमाचे पुनर्मूल्यांकन करावे आणि लोकांना खऱ्या अर्थाने लाभ देणाऱ्या प्रकल्पांकडे संसाधने वळवावीत. समाजाचा कणा असलेल्या गोव्यातील महिलांच्या अनेक गरजा अपूर्ण राहिल्या असताना मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या कार्यालयाचे भव्य नूतनीकरण करावे हे आम्हाला मान्य नाही, अशी टीका अॅड. सय्यद यांनी केली. गोवा फॉरवर्ड पक्ष गोवा सरकारकडे पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी करतो. आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, त्यांनी गोव्यातील महिलांना तीन मोफत गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. अशा व्यर्थ खर्चाला आळा घालून तो पैसा कल्याणकारी योजनांसाठी वापरावा, अशी मागणी त्यांनी केली.









