वृत्तसंस्था / लखनौ
आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्याची प्रशंसा केल्यानेच आपली समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, असा आरोप समाजवादी पक्षाच्या बंडखोर आमदार पूजा पाल यांनी केला आहे. समाजवादी पक्षाचे आणखी एक नेते अतिक अहमद यांच्या काळ्या कृत्यांविरोधात आपण पक्षात आवाज उठविला होता. त्यामुळे पक्षनेते अखिलेश यादव हे संतप्त झाले आहेत, असे प्रतिपादनही त्यांनी केले आहे. आपली पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याने आता अतिक अहमद यांचा उन्माद अधिकच वाढणार आहे, असा इशाराही त्यांनी समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाला दिला आहे. त्या आता कदाचित भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
पूजा पाल यांचे पती राजू पाल हे बहुजन समाज पक्षाचे आमदार होते. त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर काही वर्षांनी पूजा पाल यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. त्या अन्य मागासवर्गिय समाजातील वजनदार नेत्या मानल्या जातात. समाजवादी पक्षामधील माफियांकडून आपल्या जीवाला धोका आहे, अशी तक्रारही त्यांनी केली असून आपल्याला काहीही झाल्यास त्याचे उत्तरदायित्व अखिलेश यादव यांच्यावरच असेल, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.









