अन्न सचिव संजीव चोप्रा यांची माहिती : धान्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याची माहिती
नवी दिल्ली :
पीक वर्ष 2022-23 मध्ये खराब हवामानामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. याचा मोठ्या प्रमाणात धान्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. यामुळे भारतातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. अशा स्थितीतही, सरकार गव्हाच्या चांगल्या पिकाची अपेक्षा करत आहे आणि पीक वर्ष 2022-23 मध्ये सुमारे 112 दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होऊ शकणार असल्याची अपेक्षा असल्याचे अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी सांगितले आहे.
देशाच्या काही भागात खराब हवामानामुळे धान्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत असूनही 2022-23 पीक वर्षात सरकारला 112.18 दशलक्ष टन गव्हाचे विक्रमी उत्पादन अपेक्षित असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.
जुलै ते जून साठीचा अंदाज
सरकारने 2022-23 पीक वर्षात म्हणजेच दुसऱ्या वर्षाच्या जुलै ते जून या कालावधीत 112.18 दशलक्ष टन गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हा आकडा गेल्या वर्षीपेक्षा जास्त राहणार असल्याचेही म्हटले आहे.
खराब हवामानामुळे नुकसान
चोप्रा म्हणाले, गेल्या दोन आठवड्यांपासून खराब हवामानामुळे गव्हाच्या पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. हे लक्षात घेऊन केंद्राने म्हटले आहे की, प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गव्हाच्या पिकाचे सुमारे 8 ते 10 टक्के नुकसान झाल्याचा अंदाज मांडला आहे. मध्य प्रदेशात गहू खरेदीसाठी गुणवत्ता निकष शिथिल करण्यात आले आहेत आणि केंद्र लवकरच पंजाब आणि हरियाणामध्ये गहू खरेदीसाठी गुणवत्ता मानदंड शिथिल करण्याचा विचार करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.









