कर्ज स्वस्त होण्याची अपेक्षा वाढली, किरकोळ महागाई 4.25 टक्क्यांवर : मे महिन्यातील आकडेवारीने दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात किरकोळ महागाईत घसरण झाल्याने पुन्हा एकदा देशवासियांना दिलासा मिळाला आहे. मे महिन्यात किरकोळ महागाई दर एप्रिलमधील 4.70 टक्क्मयांवरून 4.25 टक्क्मयांपर्यंत खाली आला आहे. किरकोळ चलनवाढीचा दर घसरलेला हा सलग चौथा महिना आहे. हा दर एप्रिल 2021 मधील 4.23 टक्क्यांनंतरचा सर्वात कमी आहे. महागाई दरात घसरण होत असल्यामुळे आता गृह आणि वाहन कर्जाच्या व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा वाढली आहे. मधल्या काळात महागाई दर वाढल्याने रिझर्व्ह बँकेने रेपोरेटमध्ये वाढ केली होती. परंतु आता महागाई नियंत्रणात आल्याने आरबीआयकडून आता व्याजदर कमी केले जाण्याची शक्यता आहे.
आरबीआयने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाई दर 5.1 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर एप्रिल ते जून या तिमाहीत तो 4.60 टक्के राहण्याचा अंदाज आहे. मात्र, मे महिन्यात किरकोळ महागाई दर पुन्हा खाली आला आहे. मे महिन्यासाठी किरकोळ महागाई दर 4.25 टक्क्मयांवर आला आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात हा दर 4.70 टक्के होता. तर, गेल्यावषी म्हणजेच मे 2022 मध्ये किरकोळ महागाई दर 7.04 टक्के होता.
मे महिन्यात अन्नधान्याच्या महागाई दरातही मोठी घसरण झाली असून ती 3 टक्क्मयांच्या खाली पोहोचली आहे. एप्रिल 2023 मधील 3.84 टक्क्मयांवरून मे महिन्यात अन्नधान्य महागाई 2.91 टक्क्मयांवर आली. मे 2022 मध्ये अन्नधान्य महागाई दर 7.97 होता. तथापि, मे महिन्यात तेल आणि तत्सम वस्तूंचा महागाई दर -16.01 टक्के राहिला आहे. तर भाजीपाला -8.18 टक्के, मांस आणि मासे -1.29 टक्के, साखर 2.51 टक्के असा दर नोंद झाला आहे. इंधन आणि वीज महागाईचा दर एप्रिलमधील 5.52 टक्क्मयांवरून 4.64 टक्क्मयांवर आला.
दूध, डाळी, मसाल्याचे पदार्थ महाग
किरकोळ महागाई दरात घट झाली असली तरी दूध आणि त्यासंबंधित उत्पादनांच्या किमती 8.91 टक्क्यांवर आहेत. एप्रिल 2023 च्या तुलनेत दुधाच्या दरात वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये दूध आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांचा महागाई दर 8.85 टक्के होता. मसाल्याच्या वस्तूंचा महागाई दर 17.90 टक्के झाला असून तो एप्रिलमध्ये 17.43 टक्के होता. डाळींची महागाई 6.56 टक्के असून एप्रिलमध्ये हा दर 5.28 टक्के होता.
…तर, महागड्या कर्जातून दिलासा शक्य
किरकोळ महागाई कमी झाल्याने महागड्या ईएमआयमुळे त्रासलेल्यांना जास्तीत जास्त दिलासा मिळू शकतो. आगामी काळात स्वस्त कर्ज मिळण्याची अपेक्षा वाढू लागली आहे. आरबीआयने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाई दर 5.1 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर एप्रिल ते जून या तिमाहीत तो 4.6 टक्के राहण्याचा अंदाज आहे. मात्र मे महिन्यात किरकोळ महागाईचा दर चार टक्क्मयांच्या जवळ पोहोचल्यानंतर हाच कल असाच चालू राहिला तर ऑगस्ट 2023 मध्ये आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक झाल्यानंतर दिलासा मिळण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.
औद्योगिक उत्पादनात एप्रिलमध्ये 4.2 टक्के वाढ
भारताची औद्योगिक उत्पादन वाढ मार्च 2023 मधील 1.7 टक्क्मयांवरून एप्रिलमध्ये 4.2 टक्क्मयांवर पोहोचली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार उत्पादन आणि खाण क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे हा दर वाढल्याचे दिसून येत आहे. एप्रिल 2022 मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकानुसार कारखान्यातील उत्पादन वाढ 6.7 टक्के होती. एप्रिल 2023 मध्ये उत्पादन क्षेत्रातील निर्मिती 4.9 टक्क्मयांनी वाढली आहे. मात्र, एप्रिल 2023 मध्ये वीजनिर्मिती 11.8 टक्के वाढीच्या तुलनेत 1.1 टक्क्मयांनी घसरली आहे. तथापि, खाण उत्पादनात 5.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे.









