सतीश जारकीहोळी यांचे प्रतिपादन : जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण
बेळगाव : भावी पिढी घडविण्याची ताकद शिक्षकांमध्ये आहे. केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही खेडोपाडी जाऊन शिक्षक ज्ञानदान करतात. पूर्वी खासगी शाळांची संख्या कमी होती. परंतु आता खेडेगावातही खासगी शाळा सुरू होत असल्याने सरकारी शाळा शिक्षकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे गरजेचे बनले आहे. सध्याचे स्पर्धेचे युग असल्याने आपले विद्यार्थी या स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास सरकारी शाळांची पुन्हा एकदा भरभराट होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. मंगळवारी शिक्षक दिनाचे औचित्य साधून गांधी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत हेते. या कार्यक्रमामध्ये बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महिला व बाल कल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शिक्षक दिनाच्या शिक्षकांना शुभेच्छा देत पुढील काळात दर्जेदार विद्यार्थी घडविण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे मंत्रिमंडळ सातत्याने शिक्षण विभागात नाविन्यता आणण्याचा प्रयत्न करीत आहे. शिक्षकांनीही त्यांच्या या उपक्रमाला हातभार लावावा, असे त्यांनी सांगितले. बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षकांबद्दल गौरवोद्गार काढले. यानंतर जिल्ह्यातील एकूण 43 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठी, कन्नड व उर्दु माध्यमांच्या शिक्षकांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल आभार मानले. या कार्यक्रमाला विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, जिल्हा पंचायतीचे सीईओ हर्षल भोयर, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, डीसीपी पी. व्ही. स्नेहा, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जयकुमार हेबळ्ळी व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी प्रास्ताविक केले. साहाय्यक शिक्षणाधिकारी सुजाता बाळेकुंद्री यांनी स्वागत केले. यावेळी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षक दिनावर मराठीचा डंका
यावर्षीच्या शिक्षक दिन कार्यक्रमामध्ये पहिल्यांदाच मराठीला स्थान देण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवातच मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मराठी गीतांवर मराठमोळ्या अंदाजात केली. फुलबाग गल्ली येथील मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम गणेशवंदना सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. पहिल्यांदाच आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठीला स्थान देण्यात आल्याने मराठी माध्यम शिक्षकांमधून समाधान व्यक्त होत होते.
अॅप्टेक एव्हिएशनतर्फे शिक्षक दिन
अॅप्टेक एव्हिएशन अॅन्ड हॉस्पिटॅलिटी अकॅडमीतर्फे मंगळवारी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. संचालक विनोद बामणे व संचालिका ज्योती बामणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी किरण तोदले, कोमल जनी, पूजा फ्रेड चार्ल्स, प्रतिक तुडयेकर, ब्रँच मॅनेजर प्रकाश पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते. यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
स्नेहालय स्पर्श शाळेतील शिक्षिकांचा सत्कार
शिक्षक दिनानिमित्त संजीवनी फौंडेशनतर्फे स्नेहालय स्पर्श या विशेष मुलांच्या शाळेतील शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष म्हणून फौंडेशनचे सीईओ मदन बामणे उपस्थित होते. व्यासपीठावर स्नेहालयचे अध्यक्ष नरेश पाटील व संजीवनीच्या संस्थापक डॉ. सविता देगिनाळ उपस्थित होत्या. प्रारंभी विशेष मुलांना शिकविणे हे आव्हान असून या शिक्षकांचा सत्कार करणे आपले कर्तव्य आहे, असे सविता म्हणाल्या. नरेश पाटील व मदन बामणे यांनीही शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर स्नेहालयच्या शिक्षिका अर्चना शहापूरकर, राजश्री पाटील, नीता कुलकर्णी, लता काटे यांचा भेटवस्तु व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रिती नागण्णावर यांनी केले. पद्मा औशेकर यांनी आभार मानले.
मलाबार गोल्ड अँड डायमंड्सकडून शिक्षकांचा सत्कार
मलाबार गोल्ड अँड डायमंड्सकडून बेळगाव येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. केएलएस आयएमईआरचे संचालक डॉ. आरिफ शेख, जीआयटीचे प्रा. एम. एस. पाटील, नादअंजली म्युझिकच्या संस्थापिका डॉ. शैलजा कुलकर्णी, केएसआर कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्रा. राजनंदा खर्गे, मॉडेल इंग्लीश स्कूलच्या वाणी बडगंडी यांचा यावेळी मलाबार व्यवस्थापनातर्फे सत्कार करण्यात आला.









