शेतीकामासाठी मजूर मिळत नसल्याने रयत संघटनेची मागणी
बेळगाव : रोजगार हमी योजनेमुळे अनेक कुटुंबांना रोजगार मिळाला आहे. सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ गोर-गरिबांना मिळत आहे. यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक मदत मिळत आहे. मात्र या योजनेमुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. शेती कामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. यासाठी रोजगार हमी योजना कृषी खात्याशी संलग्न करून कृषी कामांसाठी विस्तारीत करण्यात यावी, अशी मागणी करत कर्नाटक राज्य रयत संघटना व हसिरु सेनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले. रोजगार हमी योजनेतून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये अधिक वेतन मिळत असल्याने महिलांसह पुरूषही या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे बहुतांश गावात रोजगार हमी योजनेतून रोजगार मिळविण्यासाठीच नागरिकांची चढाओढ सुरू आहे. रोजगार मिळविण्याच्या हव्यासापोटी बहुतांश कुटुंबीयांकडून मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सहा तास रोजगाराऐवजी चार तास करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. मजूर टंचाईची झळ शेती व्यवसायाला बसत आहे. शेतीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अधिक वेतन देणे शेतकऱ्यांना न परवडणारे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे.
तातडीने दखल घेण्याची मागणी
शेतवडीत मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांमधील तण काढणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तणनाशक औषधांचा वापर करावा लागत आहे. पण यामुळे जमिनीचा पोत घसरत असून, जमिनीचेही नुकसान होत आहे. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. बहुतांश नागरिक रोजगार हमी योजनेत काम करत असल्याने शेतकऱ्यांना मजूर टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यासाठी सरकारने रोजगार हमी योजना कृषीमध्येही अंमलात आणावी. त्यामुळेच शेतकऱ्यांचे संकट दूर होणार आहे. याची तातडीने दखल घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी नेते आप्पासाहेब देसाई, मारुती कडेमनी, चंद्रू राजाई, दुंडाप्पा पाटील, बळवंत रुटकुटे, योगेश देसाई, संजय कुट्रे, उमेश कुट्रे, विवेक पाटील, कामेश नाईक, सतीश रुटकुटे, बाळू पाटील आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लवकरच बैठक घेवू!
रोजगार हमी योजनेतील कामे जिल्हा पंचायतीच्या व्याप्तीत येतात. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी लवकरच जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांना याची माहिती देवून बैठक घेण्यात येईल. या बैठकीला शेतकऱ्यांनाही आमंत्रित करण्यात येईल, असे निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी सांगितले.









