जपान सरकार देणार 12 कोटीची भरपाई
वृत्तसंस्था/ टोकियो
जपानच्या सरकाने 89 वर्षीय इवाओ हाकामाता यांना हत्येच्या खोट्या आरोपाखाली 47 वर्षे तुरुंगात राहिल्याप्रकरणी 12 कोटी रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. हाकामाता यांना 1968 मध्ये अटक करण्यात आली होती आणि ते 2014 पर्यंत शिक्षा भोगत होते. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात जपानच्या शिजुओका शहराच्या एका न्यायालयाने त्यांना सर्व आरोपांतून मुक्त केले होते.
1966 मध्ये स्वत:चा बॉस, त्याची पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांची हत्या, घराला आग लावणे आणि 2 लाख येन (जपानी चलन) चोरल्याच्या आरोपाप्रकरणी मृत्युदंड ठोठावला होता. जपानच्या सरकारने आता घेतलेला निर्णय म्हणजे देशाच्या इतिहासात कुठल्याही गुन्हेगारी खटल्याप्रकरणी देण्यात आलेली सर्वात मोठी भरपाई असल्याचे हाकामाता यांच्या वकिलांनी म्हटले आहे.
बहिणीचे प्रयत्न ठरले यशस्वी
हाकामाता यांची बहिण हिदेको यांनी स्वत:च्या भावाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी अनेक वर्षांपर्यंत मेहनत करून पुरावे जमविले. याच पुराव्यांच्या आधारावर न्यायालयाने 2014 मध्ये या प्रकरणी पुन्हा सुनावणी सुरू केली आणि हाकामाता यांना तुरुंगातून मुक्त केले. या दिवसाची मी 57 वर्षांपासून प्रतीक्षा करत होते. अखेर माझ्या खांद्यांवरील एक भार उतरला असे उद्गार हिदेको यांनी काढले आहेत. अधिक वय आणि बिघडत्या मानसिक स्थितीमुळे हाकामाता यांना खटल्याच्या सुनावणीत सामील न होण्याची सूट देण्यात आली होती. हाकामाता हे स्वत:च्या 91 वर्षीय बहिणीच्या देखरेखीत राहत होते.
डीएनए विश्लेषणाचा आधार
प्रारंभी अटक झाल्यावर हाकामाता यांनी स्वत:वरील सर्व आरोप नाकारले होते. परंतु काही काळानंतर त्यांनी आरोप मान्य केले होते. हाकामाता यांना मारहाण करत त्यांच्याकडून गुन्हा वदवून घेण्यात आल्याचे सुनावणीदरम्यान स्पष्ट झाले. पीडितांच्या कपड्यांवर मिळालेला डीएनए आणि हाकामात यांचा डीएनए जुळला नाही. हाकामाता यांना गुन्हेगार ठरविण्यासाठी खोटे पुरावे रचण्यात आले होते असे त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे.
मानसिक आरोग्यावर परिणाम
हाकामाता यांचे हे प्रकरण जपानच्या सर्वात दीर्घ आणि सर्वात प्रसिद्ध कायदेशीर प्रकरणांपैकी एक आहे. मृत्युदंडाच्या शिक्षेने हाकामाता यांच्या मानसिक आरोग्यावर प्रतिकूल प्रभाव पाडला असल्याचे त्यांच्या वकिलांचे सांगणे आहे.









