गडहिंग्लज इस्पितळात अखेरचा श्वास : उत्तुर येथे अंत्यसंस्कार
फोंडा : गोमंतकीय बालनाट्या चळवळीचे प्रणेते व ज्येष्ठ नाट्यादिग्दर्शक मधुकर नारायण जोशी (82) यांचे रविवारी निधन झाले. आपले संपूर्ण आयुष्य रंगभूमीसाठी वाहिलेल्या जोशी यांनी साधारण पन्नास वर्षे विविध संस्थांसाठी नाट्यादिग्दर्शन केले. नाटक व काही चित्रपटांमध्येही अभिनय केला. उत्तुर कर्नाटक येथे भाच्याकडे वास्तव्यास असताना तेथेच रविवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल नाट्याक्षेत्रातून तसेच त्यांच्या असंख्य चाहत्यांकडून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. मूळ वांते सत्तरी येथील मधुकर जोशी यांचे वास्तव्य बराचकाळ फोंडा शहरात होते. येथूनच त्यांची रंगभूमिवरील कारकिर्द सुऊ झाली. कला अकादमीच्या राज्यस्तरीय नाट्यास्पर्धेत सन 1976 मध्ये आल्मेदा हायस्कूलसाठी ‘कळी एकदा फुलली होती’ या नाटकाचे त्यांनी दिग्दर्शन केले व ते सर्वोत्कृष्ट ठरले. त्यानंतर राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत सलग बारा वर्षे त्यांनी दिग्दर्शित केलेल्या एकांकिका प्रथम पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या. कला अकादमीच्या ‘अ’ आणि ‘ब’ गट नाट्यास्पर्धेसाठी त्यांनी फोंड्यातील विविध नामवंत संस्थांसाठी दिग्दर्शन केले. बऱ्याच नाटकांमध्ये स्वत: अभिनय केला व नाट्यास्पर्धांचे परीक्षणही केले. गोव्यात बालरंगभूमिच्या जडण घडणीत त्यांचा मोठा वाटा होता.
नाटकांबरोबरच गोवा दूरदर्शनवरील ‘एक अप्रकट इतिहास’, संकल्प एक मंथन अशा चित्रपटांमध्ये तसेच गोव्यातील निर्मिती असलेल्या कोकणी व मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. लोयल फोरजीद दिग्दर्शित ‘अमोक’ या फ्रेंच भाषेतील चित्रपटातील भुमिकेमुळे ते आंतराराष्ट्रीय स्तरावर पोचले. कला क्षेत्रातील योगदानाबद्दल सन 2014 साली राज्य पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले होते. राजीव गांधी कलामंदिरची निर्मिती असलेल्या ‘गोंय एक जैत कथा’ या महानाट्यात त्यांनी वयाच्या 80 व्या वर्षी भाऊसाहेब बांदोडकरांची भूमिका वठवली होती. उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी त्यांना अनेक पारिषोषिके मिळाली व त्यांची यादी त्यांनी फोंडा येथील आपल्या सदनीकेमधील भिंतीवर रंगवून ठेवली आहे. हल्लीच नाट्याक्षेत्रातील चाहत्यांकडून त्यांचा 82 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. तीन वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाल्याने काहीकाळ फोंडा व अधून मधून उत्तुर कर्नाटक येथे भाच्याकडे ते राहत होते. उत्तुरमध्ये असतानाच मागील रविवारी चक्कर येऊन पडल्याने त्यांना गडहिंग्लज येथील ऊग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोमा स्थितीत असताना काल रविवारी सकाळी 10 वा. त्यांचे निधन झाले. दुपारी उत्तूर येथे नातेवाईक व गोव्यातील काही हितचिंतकांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.









