कोल्हापूर :
तरुणीला पळवून नेण्यात मित्राला मदत केल्याच्या संशयावरुन तिघा हद्दपार गुंडांनी तरुणावर प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीसांनी तिघा हद्दपार गुंडांना अटक केली. रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमध्ये सोमनाथ प्रणिल कांबळे (वय 19, रा. गंजीमाळ, टिंबर मार्केट, कोल्हापूर) हा गंभीर जखमी झाला.
सौरभ राजाराम कांबळे (25), सिद्धेश विनायक कांबळे (23) आणि ओंकार अजित कांबळे (23, तिघे रा. टिंबर मार्केट) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. या तिघांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने या तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
टिंबर मार्केट येथील जयसिंग तरुण मंडळाजवळ रविवारी सायंकाळी सोमनाथ कांबळे याच्यावर तिघांनी प्राणघातक हल्ला केला होता. तरुणीला फूस लावून पळवून नेण्यात मित्राला मदत केल्याच्या संशयातून सोमनाथवर हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यानंतर तिघे हल्लेखोर पसार झाले होते. जुना राजवाडा पोलिसांनी चौकशी केली असता, तिघा हद्दपार गुंडांनी हा हला केल्याचे तपासात समोर आले होते. सोमवारी सकाळी संशयीत सौरभ, सिद्धेश, ओंकार या तिघांना अटक करण्यात आले. सोमवारी न्यायालयात हजर केले. त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. दरम्यान, जखमी सोमनाथ कांबळे याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सोमनाथ कांबळे याच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघांजणांना 30 मे 2024 रोजी जिह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. मात्र तरीही हद्दपारीचा भंग करुन हे तिघेही टिंबर मार्केट येथे बिनधास्त वावरत होते.








