पशुपालकांना प्रोत्साहन, 100 वासरांचा सहभाग
प्रतिनिधी/ बेळगाव
जातीवंत वासरांची पैदास व्हावी आणि पशुपालकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत शनिवारी कंग्राळी खुर्द येथे जातीवंत वासरु प्रदर्शन आणि जनावरांचे आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात 100 हून अधिक पशुपालकांनी वासरासह सहभाग दर्शवला. त्याबरोबर सुधारित चारा बियाणांचे वाटप आणि जनावरांना जंत निर्मुलन औषधांचे वाटपही करण्यात आले. गावात प्रथमच भरविण्यात आलेल्या वासरु प्रदर्शनाला पशुपालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
प्रारंभी ग्राम पंचायत सदस्य आणि तालुका मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पाटील यांच्या हस्ते वासरु प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. पशुपालक शेतकऱ्यांनी घरातच चांगल्या जातीची वासरे तयार करावीत आणि अर्थाजन वाढवावे, या उद्देशाने गावात रॅली काढण्यात आली. यामध्ये केएलएस गोगटे कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या प्रदर्शनात विशेषत: एचएफ, जर्सी, सायवाल जातींच्या गाईंची वासरे सहभागी झाली होती. त्याबरोबर जातीवंत म्हशींची रेडकू पहायला मिळाली.
शेतीला जोड व्यवसाय म्हणून अलिकडे जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यांना प्रोत्साहन मिळावे. यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी गावातील जनावरांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्यात आली. त्याबरोबर शेतकऱ्यांच्या जनावरांना सकस आणि चांगल्या प्रतीचा चारा उपलब्ध व्हावा. यासाठी सुधारित जातीच्या बियाणांचे मोफत वितरण करण्यात आले. त्याबरोबर काही जनावरांना जंत निर्मुलन औषधाचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी मुख्य पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पाटील, डॉ. प्रताप हन्नुरकर, डॉ. दीपक यलिगार, डॉ. चंद्रशेखर धारणेपगौडर, डॉ. अनिलकुमार गंगरे•ाr, डॉ. प्रकाशमनी यासह विद्यार्थी, पशुपालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.









