प्रदर्शनाचे मराठा मंदिर येथे आयोजन
प्रतिनिधी/ बेळगाव
लोकमान्य सोसायटीतर्फे 2000 क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मराठा मंदिर येथे भरविण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोसायटीचे संचालक गजानन धामणेकर, मराठा मंदिरचे सचिव बाळासाहेब काकतकर, लोकमान्यचे जनसंपर्क अधिकारी राजू नाईक, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त मंजिरी व अॅड. नंदिनी शहासने उपस्थित होते.
पुणे येथील कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ‘ओळख देशभक्तांची, शाळा तेथे क्रांतिमंदिर’, ही 948 दिवसांची परिक्रमा महाराष्ट्र, गोवा व बेळगाव येथे सुरू आहे. या अंतर्गत हे प्रदर्शन भरविण्यात येते. उद्घाटनप्रसंगी संस्थेचे विश्वस्त व देशभक्त कोशकार चंद्रकांत शहासने यांनी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सहकारी सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या प्रयत्नांमुळे सोसायटीने केलेल्या आर्थिक सहकार्यामुळे हे प्रदर्शन समाजापर्यंत पोहोचविणे शक्य झाल्याचे स्पष्ट केले. गजानन धामणेकर यांनी लोकमान्य सोसायटीची सामाजिक बांधिलकी, लोकसंग्रह, विद्यार्थी आणि गरजूंसाठी वेळोवेळी केलेली मदत व अन्य उपक्रम याबद्दल माहिती दिली. या प्रदर्शनात सावरकर प्रेमी संजय रायकर यांनी अंदमान येथील सेल्युलर जेलची हुबेहुब प्रतिकृती सादर केली आहे. लोकमान्यचे जनसंपर्क अधिकारी राजू नाईक यांनी आभार मानले.









