प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील सुप्रसिद्ध कलाकार कालिदास काशिनाथ सातार्डेकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले असून ते 12 जूनपर्यंत चालणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमात गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकले नव्हते. मात्र काल शुक्रवारी त्यांनी या प्रदर्शनास आवर्जून भेट देऊन शुभेच्छा दिल्या. गोवा ही खरोखर कलाकारांची भूमी असल्यामुळे अनेक कला क्षेत्रातील कलाकार राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर गोव्याचे नाव गाजवताना पाहून अत्यानंद होतो व त्यांचा मनापासून अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार मंत्री गावडे यांनी यावेळी काढले. या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उजगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवानंद आजगावकर, संतोष आजगावकर आणि इतर मान्यवर उपसथित होते. सुप्रसिद्ध अभिनेते आणि चित्रकार नाना पाटेकर यांनीही या प्रदर्शनास भेट देऊन कालिदास सातार्डेकर यांचे अभिनंदन केले. हे प्रदर्शन दिनांक 12 जूनपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.









