आज-उद्या पर्वणी : दुर्मीळ नाणी पाहता येणार
प्रतिनिधी/ बेळगाव
रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावच्यावतीने 28 व 29 डिसेंबर रोजी चलनी नोटा व नाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत हिंदवाडी येथील महावीर भवन येथे हे प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनामध्ये भारतातील पहिल्या नाण्यापासून आतापर्यंतच्या सर्व चलनांचा समावेश असणार आहे. देशातील चलनांचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरेल, अशी माहिती अऊण कामुले यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सतराव्या शतकापासून आतापर्यंतच्या चलनी नाण्यांचा समावेश प्रदर्शनात करण्यात येणार आहे. बेंड बार, सातवाहन, चंद्रगुप्त मौर्य यांच्याही नाण्यांचा समावेश करण्यात आला आहे. एकाच दिवशी सर्व नाणी प्रदर्शनात मांडणे शक्मय नसल्यामुळे पहिल्या दिवशी नाणी तर दुसऱ्या दिवशी नोटा प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. भारत सरकारकडून काही नाणी एका विशिष्ट समारंभ अथवा कार्यक्रमासाठी काढली जातात. ही नाणी चलनामध्ये नसली तरी ती संग्रहासाठी वापरली जातात. त्यामुळे अशी दुर्मीळ नाणी नागरिकांना पाहता येणार आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरप्रमाणे नोटांचे संग्रह असणार आहेत. अऊण कामुले यांनी मागील 65 वर्षात जमविलेल्या या नाण्यांचे हे प्रदर्शन असणार आहे. दुर्मीळ नाणी तसेच भारतीय चलनाचा इतिहास जाणून घेण्याची बेळगावमधील नागरिकांना ही सुवर्णसंधी असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई यांनी केले.
यावेळी बिर्ला इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या शैलजा करोशी, इव्हेंट चेअरमन तेजस्विनी, शिरीष मुतालिक देसाई, सिद्धांना वर्मा, लतेश पोरवाल, डी. बी. पाटील यांच्यासह रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे सदस्य उपस्थित होते.









