विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग : ऐतिहासिक पर्यटनस्थळांचे दर्शन
बेळगाव : ऐतिहासिक व सामाजिक स्थळांची माहिती व्हावी, यासाठी आरपीडी पदवीपूर्व महाविद्यालयातील कला आणि वाणिज्य शाखेतर्फे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एसकेई संस्थेचे ज्ञानेश कलघटगी, लता कित्तूर, माधुरी शानभाग, बिंबा नाडकर्णी, सरिता पाटील आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यटनस्थळांविषयी चौकसबुद्धी निर्माण व्हावी, यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. विशेषत: बेळगाव, कारवार, धारवाड, विजयनगर आणि म्हैसूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, मंदिरे, शेती आणि इतर बाबींबाबत प्रदर्शन मांडण्यात आले होते. यामध्ये स्वातंत्र्यसैनिक, ऐतिहासिक गड-किल्ले, शेती, राजकीय, शैक्षणिक आणि इतर बाबी मांडण्यात आल्या होत्या.
शिवाय विद्यार्थ्यांनीही याबाबत अधिक माहिती दिली. शेतीतील वेगवेगळी पिके दैनंदिन आहारात कशी उपयोगी पडतात? याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली. त्याबरोबर बेळगावातील राजहंसगड, भुईकोट किल्ला आणि स्वातंत्र्यसैनिकांची माहितीही याठिकाणी ठेवण्यात आली होती. अलीकडे मोबाईलचा अतिरेक वाढला आहे. त्यामुळे मानवी जीवनावर याचा कसा परिणाम होतो? याविषयीचे ज्ञान विद्यार्थ्यांनी मूक अभिनयाने सादर केले. शिवाय वाढता मोबाईलचा वापर टाळा, असेही सांगण्यात आले. यावेळी जीएसएस कॉलेजचे प्राचार्य अरविंद हलगेकर, एस. एम. देसाई, आरपीडी कॉलेजच्या प्राचार्य सुजाता बिजापुरे, डॉ. अभय पाटील यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. हे प्रदर्शन गुरुवारीही सुरू राहणार आहे.









