व्हीटीयूची अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी
बेळगाव : विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या पदवी विद्यार्थ्यांसाठी एक नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षामध्ये दोन पदव्या घेण्याची सवलत मिळणार आहे. विद्यापीठाने एक मायनर पदवी व एक बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग पदवी अशा दोन पदव्या एकाचवेळी देण्याचा निर्णय घेतला आहे. रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. औद्योगिक कारखान्यांनी याबाबतचा प्रस्ताव विद्यापीठ आणि सरकारकडे ठेवला होता. त्याला अनुसरून विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. जर विद्यार्थी चौथ्या सेमिस्टरमध्ये शिकत आहेत आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये पाचव्या सेमिस्टरला प्रवेश घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांना एकाचवेळी दोन पदव्या घेता येतील. मायनर पदवी ऑनलाईन पद्धतीने दिली जाईल. मात्र, यासाठीचे वर्ग आणि परीक्षासुद्धा ऑनलाईन असतील. मायनर पदवीसाठी सी++, कृत्रिम बुद्धिमत्ता, आयओटी डेटा सायन्स, कन्स्ट्रक्शन मटेरियल टेक्नॉलॉजी व एन्व्हीरॉन्मेंटल स्टडीज या विषयासाठी पदव्या मिळू शकतात. मात्र, एकाचवेळी दोन पदव्या घेण्याची सक्ती नसून विद्यार्थ्यांना निवडीचे स्वातंत्र्य आहे. या अभ्यासक्रमासाठी मोठमोठ्या औद्योगिक आस्थापनांमधून तसेच कारखान्यांमधून तज्ञ लोक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
विद्यार्थी आवडीनुसार विषय निवडू शकतात
विषयांची निवड करण्याचे स्वातंत्र्य पूर्णपणे विद्यार्थ्यांना आहे. अनेक विषय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असून विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार निवडू शकतात. सदर विषयसुद्धा कारखानदारांनी दिलेल्या सूचनांवरच आधारित आहेत, असे कुलगुरु विद्याशंकर एस. यांनी स्पष्ट केले आहे. या नवीन संधीमुळे विद्यार्थ्यांचे बरेच पैसे वाचणार आहेत. लहानसहान कोर्ससाठी त्यांना खासगी संस्थामध्ये भरमसाट फी भरावी लागत होती. आता त्याची गरज भासणार नसून सिव्हिल शाखेचा विद्यार्थी कॉम्प्युटर सायन्सची पदवीसुद्धा घेऊ शकतो आणि अधिक पैसे खर्च न करता त्यांना एकाचवेळी दोन पदवी प्रमाणपत्रे मिळणार आहेत.









