दक्षिण गोवा जिल्हा पंचायत बैठकीत ठराव
प्रतिनिधी/ मडगांव
पश्चिम घाट क्षेत्र सांभाळण्यासाठी, इको सेन्सिटिव्ह बफर झोन क्षेत्र करण्याचा विचार सुरू आहे. दरम्यान, इको सेन्सिटिव्ह क्षेत्राखाली येणारी सांगे तालुक्मयातील गावे वगळा असा ठराव काल दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. रिवण मतदारसंघाचे सदस्य सुरेश केपेकर यांनी हा ठराव मांडला.
सांगे तालुका आधीच मागास तालुका असून इको सेन्सिटिव्ह विभागाची बंधने आल्यास त्याचा विकास अधिकच खुंटला जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. सांगेचे आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई यांनीही इको सेन्सिटिव्ह झोनला यापूर्वीच विरोध केला असून आपण ग्रामस्थांबरोबर ठाम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हा पंचायतीच्या बैठकीत झालेल्या चर्चेत नव्याने बांधण्यात येणाऱया बोरी पुलाला मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. दक्षिण गोव्यात जिल्हा पंचायत भवन व्हावे यासाठी मुखमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे प्रस्ताव पाठवावा. तसेच कित्त्येक गावात अजुन पुरेशी बससेवा उपलब्ध नाही. त्यामुळे त्या गावात कदंब बस सुरू करण्यासाठी कदंब महामंडळाच्या अध्यक्षाकडे पाठपुरावा करण्याचा ठराव घेण्यात आला.
दक्षिण गोवा जिल्हा पंचायत समितीमार्फत 284 विकासकामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर यांनी दिली. 15 व्या वित्त आयोगाकडून जिल्हा पंचायतीला 2.80 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून ही कामे हातात घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.









