रत्नागिरी :
आमच्या बहुतांशी जमिनींवर शेती आणि आंबा बागायती तसेच राहती घरे आहेत. अशा काही जमिनी भूसंपादन प्रक्रियेतून वगळण्यात याव्यात, अशी मागणी गडनरळ ग्रामस्थांकडून करण्यात आली. या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल, असे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले. तालुक्यातील वाटद एमआयडीसी भूसंपादनासंदर्भात गुरुवारी वैयक्तीक हरकतींवरील सुनावणी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.
वाटद एमआयडीसी भूसंपादनासंदर्भात हरकतींवर गुरुवारी सकाळी गडनरळ गावातील ग्र्रामस्थांच्या वैयक्तीक अर्जांवरील सुनावणी प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील गडनरळ गावातील 12 अर्जांसाठी 60 ग्रामस्थांच्या हरकतींवरील म्हणणे येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ऐकून घेण्यात आले. सकाळी 11 च्या सुनावणीसाठी गडनरळ गावातील हरकती दाखल केलेले 60
ग्रामस्थ सुनावणीसाठी हजर होते. यावेळी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना करमाळे उपस्थित होत्या.
तालुक्यातील वाटद एमआयडीसी येथे प्रस्तावित असलेल्या रिलायन्स कंपनीसाठी 22 एकर जमिनीचे भूसंपादन करण्यासंदर्भात संबंधित ग्रामस्थांकडून हरकती मागवण्यात आल्या होत्या. या हरकतींवर 4 जुलै रोजी कोळीसरे व मिरवणे, 7 जुलै रोजी कळझेंडी व वाटद आणि 10 जुलै रोजी गडनरळ येथील ग्रामस्थांची वैयक्तीक अर्जावरील सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली. प्रत्येक सुनावणीदरम्यान ग्रामस्थांकडून मांडण्यात आलेले मुद्दे आणि त्यांची मागणी आता शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे प्रांताधिकारी देसाई यांनी सांगितले.








