टीव्ही-डी1 चाचणी उड्डाणाचा व्हिडिओ ‘इस्रो’कडून जारी
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’चे शास्त्रज्ञ अवकाशात नवा इतिहास रचत आहेत. चांद्रयान-3 च्या यशानंतर, इस्रोने अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याच्या मोहिमेतील ‘गगनयान’चे पहिले चाचणी उड्डाण यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहे. पहिल्या टप्प्यात प्रक्षेपणात काही तांत्रिक अडचणी आल्या असल्या तरीही क्रू मॉडेल लॉन्च अखेर यशस्वी झाले. इस्रोने रविवारी या मोहिमेशी संबंधित एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात काही रोमांचक क्षण कैद झालेले दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये गगनयान ‘टीव्ही-डी1’ मिशनच्या चाचणीतील काही महत्त्वाचे टप्पे पाहायला मिळत आहेत.
इस्रोने जारी केलेल्या गगनयान मोहीम प्रात्यक्षिक चाचणीसंबंधीच्या या व्हिडिओमध्ये ऑनबोर्ड कॅमेऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेचे रेकॉर्डिंग केलेले दिसत आहे. इंजिन सुरू होणे, उड्डाण वर जाणे, क्रू स्पेस सिस्टीम आणि क्रू मॉडेल वेगळे करणे, पॅराशूट उघडणे आणि सिस्टीम समुद्रात पडणे यासारख्या रोमांचक बाबी कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. काही निवडक महत्त्वाचे क्षण एकत्रित करून स्वतंत्र व्हिडिओ तयार करण्यात आला असून तो रविवारी इस्रोने व्हायरल केला. या व्हायरल व्हिडिओमधून ‘टीव्ही-डी1’ प्रात्यक्षिक चाचणी अनुभवायला मिळत आहे.









