गर्दीने रस्ते फुलले : हलते-सजीव देखावे लक्षवेधी, ठिकठिकाणी भाविकांना प्रसादाचे वाटप
बेळगाव : सजीव व हलते देखावे हे बेळगावच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्या आहे. ही परंपरा यंदाही अनेक मंडळांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांत गणेशमूर्ती व देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होताना दिसत आहे. रात्री उशिरापर्यंत गणेश दर्शनाचा उत्साह बेळगाव शहरासह उपनगरामध्ये पहायला मिळत आहे. यावर्षी शिवाजीनगर येथील मंडळांनी देखाव्यांमध्ये बाजी मारली आहे. महादेवावर आधारित हलते देखावे, तसेच गुहा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. मागील महिन्याभराच्या मेहनतीनंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंदिराचे देखावे तयार केले आहेत. त्यामुळे ते पाहण्यासाठी गणेशभक्तांचा ओढा शिवाजीनगरकडे दिसून येत आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगरचे रस्ते गर्दीने फुलत आहेत. याबरोबरच शामाप्रसाद मुखर्जी रोड येथील मंडळाने हलता देखावा सादर केला आहे. दरवर्षी या मंडळाने नवनवीन देखावे सादर करून भाविकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर अष्टविनायकनगर वडगाव येथील भव्य गणेशमूर्ती पाहण्यासाठी, तसेच प्रतिमा मोबाईलमध्ये टिपण्यासाठी तरुणाईची धडपड सुरू आहे. भांदूर गल्ली गणेशोत्सव मंडळाने रविवारी गंगाआरतीचे आयोजन केले होते.
पावसामुळे भाविकांचा हिरमोड
रविवारी साप्ताहिक सुटी असल्यामुळे गणेश दर्शनासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना पावसाचा फटका बसला. मध्यरात्रीपर्यंत पाऊस सुरू राहिल्याने भाविकांचा हिरमोड झाला. सोमवारी सायंकाळी पावसाचा जोर कमी असला तरी अधूनमधून सरी सुरू होत्या. परंतु त्यातही गणेश दर्शनासाठी नागरिक बाहेर पडत असल्याचे दिसून आले. बेळगावसह खानापूर, संकेश्वर, बैलहोंगल, चंदगड या भागातून गणेशभक्त शहरात येत होते.
ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप
गणेशमूर्ती पाहण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रत्येकाला हॉटेलमध्ये जाऊन खाणे परवडणारे नसते. त्यामुळे काही मंडळांकडून मसाला भात, शिरा, उप्पीट, पोहे यासह इतर अल्पोपाहाराचे वाटप करण्यात येत होते. यामुळे गणेशभक्तांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. पावसामुळे अद्याप म्हणावी तशी गर्दी होत नसली तरी लहान विक्रेत्यांना आर्थिक मदत होत आहे.









