काश्मीर-परिमपोरामध्ये घातपाताचा प्रयत्न
श्रीनगर
सुरक्षा दलांना सोमवारी श्रीनगरनजिकच्या परिमपोरा भागात एक आयईडी बांधलेला गॅस सिलिंडर सापडला. लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाकडून शोध सुरू असताना टोयोटा अन्सारी मोटर्सजवळ स्फोटके असल्याचे निदर्शनास आले. ही स्फोटके गॅस सिलिंडरमध्ये ठेवण्यात आली होती. यासंबंधीची माहिती मिळताच बॉम्बशोधक पथकाने कोणतेही नुकसान न करता स्फोटके निकामी केली. या भागातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यापूर्वी 19 ऑक्टोबर रोजी कुपवाडा जिह्यात मोठय़ा प्रमाणात आयईडी सापडली होती. त्यानंतर आता परिमपोरा येथे सापडलेल्या स्फोटकांमुळे सुरक्षा दलांकडून सतर्कता बाळगली जात आहे.









