शहर परिसरात गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठय़ा भक्तिभावाने साजरा करण्यात आला. संस्था-संघटना तसेच शाळांमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना वंदन केले तर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या पूर्व शिक्षकांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. गुरुपौर्णिमेनिमित्त मंडोळी रोड शांतीनगर येथील गजानन महाराज मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सनातन संस्थेतर्फे भाग्यनगर सिटी हॉलसह विविध ठिकाणी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. समाज माध्यमांवरही गुरुपौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेश दिवसभर प्रसारित होत होते.
दैवज्ञ गणेशोत्सव संघातर्फे गुरुपौर्णिमा साजरी
दैवज्ञ गणेशोत्सव मंडळातर्फे श्री कालिकादेवी मंदिर येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. श्री श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वरी स्वामीजींच्या प्रतिमेची पूजा दीपक अडकूरकर यांच्या हस्ते करण्यात आली.
संघाचे अध्यक्ष नितीन कलघटकर व भक्तांच्यावतीने श्री कालिकादेवीची आरती करण्यात आली. याप्रसंगी हेमंत मुतकेकर, दीपक कलघटगी, विशाल शिरोडकर, नितीन नंद्याळकर, विनायक कणबरकर, अतुल पारिश्वाड, राघवेंद्र काकतीकर, राजेश कारेकर, जगदीश सोनार व अन्य भक्त उपस्थित होते. पुरोहित गजानन सोमण यांचे कार्यक्रमाला पौरोहित्य लाभले.
माजी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा सन्मान
ठळकवाडी हायस्कूलच्या 1972 साली दहावी झालेल्या विद्यार्थ्यांकडून आपल्या तत्कालिन शिक्षकांचा सन्मान करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. शिक्षक एम. आर. कुलकर्णी आणि मल्लप्पगोळ या दोघांचा शाल, गुलाबपुष्प आणि मिठाई देऊन गौरव करण्यात आला. टिळकवाडी येथे वास्तव्य असलेल्या कुलकर्णी सर यांच्या घरी विद्यार्थ्यांनी बुधवारी भेट देऊन हा सन्मान केला. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी विद्यार्थी अनंत लाड, मोहन पवार, प्रमोद कुलकर्णी, बंडू सिंदगी, अंतोन कारवालो आणि भोमाणी बिर्जे हे उपस्थित होते. 50 वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांनी हा आपुलकीचा कार्यक्रम केल्याबद्दल गुरुवर्यांनी आनंद व्यक्त केला.
भांदुर गल्ली श्री मरगाई मंदिर येथे गुरुपौर्णिमा साजरी
श्री मरगाई योग मंदिर भांदुर गल्लीतर्फे बुधवार दि. 13 जुलै रोजी स्मॉल स्केल इंडस्ट्रिजचे चेअरमन महादेवराव चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी योगशिक्षक विजय घाटगे व योगसाधिका रेखा मुतकेकर, गौतमी पाटील, शोभा पाटील, स्नेहल पाटील, गीता गेंजी, विद्या पाटील, प्रिती नाईक, रूपाली पाटूकले, मंदा कोवाडकर, अनुराधा घाटगे, जयश्री जुवेकर, ममता मोटार, महानंदा गंगण्णावर, स्वामिनी पाटील यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात पतंजली मुनींच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. आजच्या दिवसाचे महत्त्व अध्यक्षांनी सांगितले. यावेळी रूपाली पाटूकले व महानंदा गंगण्णावर यांनी आपले विचार व्यक्त केले.
साई ज्योती सेवा संघातर्फे ठळकवाडी हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून येथील साई ज्योती सेवा संघाच्यावतीने ठळकवाडी हायस्कूलमधील गुरुजनांचे पाद्यपूजन करण्यात आले. प्रत्येकाच्या जीवनात गुरुंच्या मार्गदर्शनाला एक वेगळेच महत्त्व आहे. युवापिढीने गुरुजनांबद्दल आदर बाळगण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाला संघाच्या संचालिका ज्योती निलजकर, ज्योती बाके, सुमंगला पुजारी, सारिका शिंदगी, वीणा चौगुले, शीतल पाटील, श्रृती येळ्ळूरकर, सुनीता कटायत व प्राचार्य आर. आर. कुडतरकर उपस्थित होते. यावेळी ठळकवाडी हायस्कूलचे शिक्षक व इतर अनेक मान्यवर कार्यक्रमात सहभागी झाले होते.