सेन्सेक्स 374 अंकांनी मजबूत ः सलगची चौथी तेजी
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात मंगळवारी आशियातील आणि युरोपातील बाजारात राहिलेल्या तेजीमुळे विदेशी संस्थांकडून करण्यात आलेल्या सलगच्या गुंतवणुकीमुळे देशातील बाजारात सकारात्मक कल राहिला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर मंगळवारी 374.75 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.62 टक्क्यांसोबत 61,121.35 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 133.20 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.74 टक्क्यासोबत 18,145.40 बंद झाला आहे.
मुख्य कंपन्यांमध्ये मंगळवारी एनटीपीसी, पॉवरग्रिड कॉर्प, डॉ.रेड्डीज लॅब, इन्फोसिस, टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक्नॉलॉजी, सनफार्मा आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग नफा कमाईत राहिले होते. अन्य कंपन्यांमध्ये ऍक्सिस बँक, मारुती सुझुकी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा स्टील यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.
जागतिक पातळीवरील घडामोडींच्या सकारात्मक परिणामुळे आशियातील अन्य बाजारापैकी दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्की, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे लाभासह बंद झाले आहेत. तर युरोपीयन बाजार सुरुवातीच्या काळात मिळता जुळता कल निर्माण करत कार्यरत राहिला होता.
याच दरम्यान घडामोडींच्या प्रभावासोबत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 1.45 टक्क्यांनी वधारुन 94.16 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले असल्याची नोंद करण्यात आली आहे. मागील आठवडय़ात काही अभ्यासकांनी आगामी काळात बाजाराची वाटचाल मजबूत व सकारात्मक राहणार असल्याचे भाकीत केले होते. सध्या तरी ते खरे होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु येणाऱया दिवसांमध्येही शेअर बाजाराची वाटचाल कशी राहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असल्याचेही तज्ञांनी म्हटले आहे.








