पिता-पुत्रासह सुनेची गोळ्या झाडून हत्या
► वृत्तसंस्था/ मैनपुरी
उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिह्यात सोमवारी एक मोठी घटना घडली. करहाळ येथील नागला अतिराम गावात रस्त्यावरून झालेल्या कौटुंबिक वादात सोमवारी एका महिलेसह पिता-पुत्राची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्याकांडानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गावात हिंसाचार निर्माण झाल्याने पोलीस अधीक्षक विनोद कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश कुमार यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता.
नागला अतिराम गावातील रहिवासी कायम सिंग आणि सोबरान सिंग हे एकाच कुटुंबातील आहेत. दोन्ही घरे जवळच आहेत. घरातून बाहेर पडण्याच्या मार्गावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून सोमवारी सोबरानने केलेल्या गोळीबारात कायम सिंग (50), त्याचे वडील रामेश्वर सिंग (75) या दोघांसह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तसेच गोळी लागल्याने कुटुंबातील अन्य एक महिला गंभीर जखमी झाली. तिला सैफेई वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिहेरी हत्याकांडानंतर गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मारेकऱ्यांच्या शोधात पोलीस छापेमारी करत आहेत. मात्र, रात्री उशिरापर्यंत गोळीबार करणारा पोलिसांना सापडला नव्हता.









